टेक्नोसॅव्ही प्रचाराने आणली रंगत
By admin | Published: February 17, 2017 04:25 AM2017-02-17T04:25:12+5:302017-02-17T04:25:12+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक पुरंदरमध्ये नुसती गाजत नाही, तर वाजतेय पण. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी
सासवड : जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक पुरंदरमध्ये नुसती गाजत नाही, तर वाजतेय पण. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी प्रचारासाठी गाड्या केल्या असून, त्यावर आपण व आपल्या पक्षाने केलेल्या कामांची गाणी सिनेसंगीतावर वाजविली जात आहेत. कामांचा लेखाजोखा मांडला जात आहे, अर्थात हे सर्व रेकॉर्डिंग केलेले आहे. गाडीवान फक्त एका जागी गाणे ऐकवितो किंवा फिरता राहतो.
विधानसभा निवडणूकप्रसंगी वापरलेले फिल्म दाखविण्याचे तंत्रही वापरले जात आहे. त्यामुळे निवडणूक ग्रामीण भागात चांगलीच वाजत आहे. फ्लेक्सचे प्रमाण कमी आहे. मात्र, जेवणावळी जोरात सुरू आहेत. त्यामुळे केटरर्स व ढाबेमालक-चालकांची चलती आहे. शाकाहारी,मांसाहारी जेवण दिले जात आहे, आचारसंहितेनुसार जाहीर प्रचार रात्री दहा वाजता संपत असला, तरी खरा व्यक्तिगत प्रचार दहानंतरच सुरू होतो. नेतेमंडळी रातोरात फिरत आहेत. सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरूआहे.
जेवणावळीबरोबरच आता धरण पाहण्यासाठी सहली नेल्या जात आहेत. धरणात अडविले पाणी पाहा, उद्या ते आपल्याकडे येईल, हे पाहा व आम्हाला निवडून द्या, असाही प्रकार सुरू आहे. पुरंदर हा दुष्काळी तालुका समजला जातो. लोकही आपण दुष्काळी असल्याचे सांगतात. नेतेमंडळी दुष्काळ दूर करण्याचे आश्वासन देतात. सर्वच राजकीय पक्षातील उमेदवार मात्र कोट्यधीश असल्याचे पुढे आले आहे. आता तर एका नेत्याने दुसऱ्या जिल्ह्यात चक्क साखर कारखाना विकत घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता या तालुक्याला दुष्काळी कोण म्हणेल, असा प्रश्न आहे. अर्थात निवडणुकीत कोट्यवधीची उलाढाल झाली, तरी निवडणूक संपल्यावर फेब्रुवारी-मार्चमध्ये पुन्हा टँकरची मागणी व दुष्काळ हटविण्याच्या घोषणा सुरू राहणार आहेत.