हवेलीच्या तहसीलदारांना बळजबरीने दिली गुगल पे ने लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:15 AM2021-09-15T04:15:57+5:302021-09-15T04:15:57+5:30

लोणी काळभोर : अवैधपणे वाळू वाहतूक करणाऱ्याने ट्रक सोडण्याकरिता हवेली तहसीलदार यांच्या वैयक्तिक बचत खात्यावर ५० हजार रुपये जमा ...

Tehsildar of Haveli was forcibly bribed by Google Pay | हवेलीच्या तहसीलदारांना बळजबरीने दिली गुगल पे ने लाच

हवेलीच्या तहसीलदारांना बळजबरीने दिली गुगल पे ने लाच

Next

लोणी काळभोर : अवैधपणे वाळू वाहतूक करणाऱ्याने ट्रक सोडण्याकरिता हवेली तहसीलदार यांच्या वैयक्तिक बचत खात्यावर ५० हजार रुपये जमा करून लाच देण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी खडकमाळ पोलीस ठाण्यात लाच देणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी (दि १३) दुपारी पुणे-सोलापूर महामार्गावर शेवाळवाडी येथे एक ट्रक वाळू वाहतूक करताना आढळला. यावेळी तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांनी ट्रक थांबविण्यास सांगितला. ट्रक चालकाने ट्रक थांबवत ट्रकची चावी काढून घेत पळून गेला. तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांनी हडपसरचे मंडलाधिकारी व्यंकटेश चिरमुल्ला यांना फोन करुन संबंधित तलाठी किंवा कोतवालांना घटनास्थळी बाेलावले. त्याची वाट बघत असताना त्या ठिकाणी एक तरुण त्यांच्या जवळ आला. मी ट्रकचा मालक आहे, असे म्हणत गाडी सोडण्याची विनंती करू लागला. त्यांना पैशाचे आमिषही त्याने दाखवले; मात्र कोलते पाटील यांनी नकार दिला. काही वेळाने कोतवाल तंगाडे तेथे आले. तहसीलदार यांनी त्यांना संबंधित गाडीची तपासणी करुन पंचनामा करण्याच्या सूचना देऊन त्या तहसील कार्यालयाकडे निघाल्या. शेवाळवाडी ते तहसील कार्यालय या प्रवासादरम्यान संबंधित गाडी मालक त्याच्या दुचाकीवरुन गाडीचा पाठलाग करत त्यांना गाडी थांबविण्यास सांगितले; मात्र पाटील न थांबता कार्यालयात आल्या. यावेळी एका अनोळखी क्रमांकावरून त्यांना वारंवार फोन आले. त्यांनी फोन उचलल्यावर समोरील व्यक्तीने त्यांना अकाऊंट नंबर विचारला. त्यांनी का विचारले असता त्याने तुम्ही जी वाळूची गाडी पकडली आहे. त्या गाडीच्या मालकाने मला तुमच्या अकाऊंटवर पैसे जमा करण्यास सांगितले. यावर कोलते यांनी त्या व्यक्तीला खडसावत जबरदस्तीने लाच देत असल्याने गुन्हा दाखल करेन असे सांगितले व फोन ठेवला. काम संपल्यावर त्या घरी जात असताना त्यांच्या चालकाने जप्त केलेल्या ट्रकच्या मालकाने तुमच्या अकाऊंटवर पैसे जमा केल्याचे सांगितले. पाटील यांनी त्यांचे खाते तपासले असता आधी एक रुपया जमा झाल्याचे व नंतर ५० हजार रुपये जमा झाल्याचे आढळले. अनधिकृत वाळू वाहतूक करणारा ट्रक तहसील कार्यालय, हवेलीच्या आवारात आहे. याबद्दल तलाठी यांचा अहवाल त्यांच्याकडे जमा आहे व वाहन चोरीला जाऊ नये याकरिता सुरक्षा रक्षक मिळावा म्हणून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मागणी केली. कोलते यांनी वाहनचालकाने ट्रक सोडविण्याकरिता लाच देऊ केलेली बाब धक्कादायक असून या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Web Title: Tehsildar of Haveli was forcibly bribed by Google Pay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.