धांगवडी कोविड सेंटरला तहसीलदार यांची अचानक भेट, रुग्णांच्या तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:04 AM2021-05-04T04:04:19+5:302021-05-04T04:04:19+5:30
धांगवडी (ता. भोर) येथे तोरणा विद्यार्थी गृहात कोरोना रुणांवर उपचार सुरू आहेत. मात्र, येथील व्यवस्थापनाच्या असुविधाबाबत तक्रारी तहसीलदारकडे मांडल्या. ...
धांगवडी (ता. भोर) येथे तोरणा विद्यार्थी गृहात कोरोना रुणांवर उपचार सुरू आहेत. मात्र, येथील व्यवस्थापनाच्या असुविधाबाबत तक्रारी तहसीलदारकडे मांडल्या. रुग्णांनी असुविधा मांडताना या कोविड सेंटरच्या इमारतीत गेले सहा, सात दिवस झाले येथील कचरा उचलला गेला नाही. कचऱ्याचे ढिगाऱ्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. इमारतीतील खोल्यांचे निर्जंतुकीकरण केले जात नाही. कॅन्टीनमधून रुग्णांसाठी येणारा चहा थंड दिल्याने अनेकवेळा चहा वाया जातो. रुग्णांना मिळत असलेला नाष्टा थंड व बेचव असतो. रुग्णांना मिळणारे जेवण अर्धवट शिजवलेले असते, आदी तक्रारी रुग्णांकडून तहसीलदार साहेबांसमोर मांडण्यात आल्या.
रुग्णांच्या या तक्रारीमुळे तहसीलदार साहेबांनी येथील व्यवस्थापन करणाऱ्यांना धारेवर धरून येथील यंत्रणा सुधारणेविषयी खडे बोल सुनावून कडक सूचना दिल्या. तर काही सुविधांचा जागेवरच निपटारा केला. जेवण देणाऱ्या ठेकेदारास आरोग्यदायी जेवण देण्याविषयी सांगून रुग्णांकडून पुन्हा तक्रारी आल्यास ठेकेदार बदलला जाईल, अशी तंबी दिली. या वेळी भोरचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, भोरच्या सभापती दमयंती जाधव, उपसभापती लहूनाना शेलार, मंडलाधिकारी मनीषा भूतकर, तलाठी सुधाकर सोनवणे आदी उपस्थित होते.
धांगवडी (ता. भोर) येथे कोविड सेंटरला भोर तहसीलदार अजित पाटील यांनी रुग्णांची विचारपूस करून माहिती घेत रुग्णांना दिलासा दिला.