तहजीबच्या कामाचा पहिलाच दिवस ठरला अखेरचा; येरवडा दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 08:05 PM2022-02-04T20:05:54+5:302022-02-04T20:24:08+5:30
दोन दिवस आधीच तो या ठिकाणी आला होता...
पुणे: पुण्यातील येरवडा परिसरात गुरुवारी एका इमारतीच्या पायाभरणीचे काम सुरू असताना भीषण दुर्घटना घडली. इमारतीच्या स्लॅबसाठी लागणारी जाळी तयार करण्याचे काम सुरू असताना ही जाळी काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर कोसळली. या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर काही कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
या दुर्घटनेत तहजीब आलम या तरुणाचा देखील मृत्यू झालाय. तहजीब हा बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील रहिवासी होता. सहा महिन्यांपूर्वी तो काम करण्यासाठी भावासोबत पुण्यात काम करण्यासाठी आला होता. दुर्घटनाग्रस्त साईटवर काम करण्याआधी त्याने इतर ठिकाणी काम केले. दोन दिवस आधीच तो या ठिकाणी आला होता. गुरुवारीच त्याने या ठिकाणी काम करण्यास सुरुवात केली होती. आणि संध्याकाळी ही दुर्घटना घडली. यामध्ये तहजीबचा जागीच मृत्यू झाला.
तहजीबच्या भावाने आमच्याशी बोलताना सांगितले की, या साईटवर काम करण्यासाठी येऊ नको म्हणून त्याला अनेकदा सांगितलं होतं पण त्याने ऐकले नाही. तो आला आणि ज्या दिवशी काम सुरू केले त्याच दिवशी ही दुर्घटना घडली आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. लहान भाऊ असल्यामुळे दिवसभरात दोन ते तीन वेळेस आमचं फोनवर बोलणं व्हायचं. गुरुवारी देखील दुपारी आम्ही फोनवर बोललो होतो. घरून देखील आम्हाला दररोज फोन यायचे. परंतु तो आता नाही.
या दुर्घटनेत तहजीबसह आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेले सर्वजण बिहार राज्यातील कटियार जिल्ह्याचे रहिवासी होते. या ठिकाणी काम केल्यानंतर ते जवळ असणाऱ्या लेबर कॅम्पमध्ये राहत होते. दरम्यान येरवड्यात घडलेल्या या दुर्घटनेप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मयत कामगारांच्या केल्याबद्दल सहसंवेदना व्यक्त करत पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.