तेजस, सुब्बी सिंहाची डरकाळी
By admin | Published: April 10, 2017 01:48 AM2017-04-10T01:48:34+5:302017-04-10T01:48:34+5:30
सकाळची वेळ व मागील जवळ जवळ चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर रविवारी जेव्हा तेजस व सुब्बी ही सिंहाची जोडी
धनकवडी : सकाळची वेळ व मागील जवळ जवळ चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर रविवारी जेव्हा तेजस व सुब्बी ही सिंहाची जोडी, आपल्या रात्रीच्या आवास पिंजऱ्यातून बाहेर आली आणि पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीतून शिट्टी व टाळ्यांनी त्या जोडीचे स्वागत केले़
ही जंगलाच्या राजा राणीची जोडी बाहेर येताच अनेकांचे कॅमेरा फोटो काढण्यासाठी सरसावले होते, यात बाल बच्चे कंपनीला उत्सुकता होती, अनेक पालक देखील यात सहभागी झाले होते़ इतकी माणसांची गर्दी पाहून जंगलाचा राजा असल्याने घाबरला नाही किंवा न बावरता प्रेक्षकांच्या समोर हजर झाले व पाहिजे त्या पोज मध्ये फोटो काढण्यासाठी उभे राहिले होते़ अंदाजे चार ते साडेचार फूट उंचीचे धस्ट पुष्ट असलेला त्याचबरोबर मानेवर आयाळ असलेला तेजस राजा सारखा शोभत होता़ त्याने बाहेर आल्यानंतर फोडलेली डरकाळी परिसरात गुंजली़
कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात तेजस आणि सुब्बी ही आशियाई सिंहाची जोडी रविवारी प्रथमच नागरिकांना पाहण्यासाठी खुल्या खंदकात आणण्यात आली़ तिला पाहण्यासाठी प्राणीसंग्रहालयात मोठी गर्दी झाली होती़
तेजस आणि सुब्बी साधारणपणे साडे सहा वर्षांच्या या जोडीस २५ डिसेंबर २०१६ ला गुजराजमधील जुनागढच्या शक्करबाग प्राणी संग्रहालयातून आणण्यात आले. त्यानंतर तज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात आले होते. वातावरणाशी अनुकुल झाल्यानंतर त्यांना पिंजऱ्यात पर्यटकांच्या भेटीसाठी ठेवण्यात येणार होते. ३ आठवड्यानंतर हे प्रयत्न यशस्वी झाले. तेजस व सुब्बी या जोडीला सध्या तात्पुरत्या स्वरूपात पांढऱ्या वाघाच्या खंदकात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या साठीच्या खंदकाची व्यवस्था झाल्यानंतर येथून त्यांना हलविण्यात येईल.
(प्रतिनिधी)
प्राणिसंग्रहालयामध्ये नूतनीकरण : अन्य प्राणीही येणार?
प्राणिसंग्रहालयामध्ये नूतनीकरण व मास्टर प्लॅन भाग १ नुसार ही जोडी येथे आणण्यात आली असून २ वर्षांपूर्वी कैफ या पांढऱ्या वाघास येथे आणले होते.
पुढील काळात जिराफासह अन्य प्राणीही पहावयास मिळणार असून या बाबतचा प्रस्ताव सेंटर झू अॅथोरिटीकडे मंजुरीसाठी पाठविला आहे, अशी माहिती राजकुमार जाधव यांनी दिली.
आशियाई सिंह हे राज्यातील केवळ याच प्राणीसंग्रहालयात असल्याने या प्राणी संग्रहालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. बोरिवलीच्या संजय गांधी प्राणी संग्रहालयात हायब्रीड प्रकारातील सिंह आहेत. केदार कासार या उद्योजकाने या जोडीला एक वर्षासाठी दत्तक घेतले असून चार लाख रुपयाचा धनादेश अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
कार्यक्रमासाठी महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव, उपसंचालक नवनाथ निघोट, दीपक धुमाळ, मनोज जाधव, कौशिक काशीकर, श्यामराव खुडे, दत्ता चांदणे यांसह नागपूर पशूवैद्यकिय महाविद्यालयाचे विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.
स्वागत वनराजाचे : कात्रजच्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात रविवारी वनराज ‘तेजस’ व ‘सुब्बी’ या जोडीने पुणेकरांना प्रथमच दर्शन दिले. त्यांच्या स्वागतास चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. तेजसच्या गर्जनेने आसमंत हादरून गेला.