तेजसमुळे मिळणार स्वदेशी विमान निर्मितीला बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:10 AM2021-01-15T04:10:04+5:302021-01-15T04:10:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तेजस या हलक्या लढाऊ विमानाच्या खरेदीला संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या मंजुरीमुळे स्वदेशी विमान निर्मितीच्या क्षमतेत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : तेजस या हलक्या लढाऊ विमानाच्या खरेदीला संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या मंजुरीमुळे स्वदेशी विमान निर्मितीच्या क्षमतेत वाढ होणार आहे. यामुळे हवाई दलाच्या क्षमतेत वाढ होण्याबरोबरच देशी तंत्रज्ञानाचा आणि उद्योगांचा विकास होणार आहे. यामुळे आत्मनिर्भर भारताची कल्पना साकार होणार आहे. विमान निर्मितीच्या प्रक्रियेत शेजारी चीन आपल्यापेक्षा पुढे असला तरी आपणही विमान निर्मितीला सुरुवात केली म्हणजे या क्षेत्रात ‘देर आये लेकिन दुरुस्त आये’ असे म्हणावे लागेल, अशी भावना हवाई दलातील माजी अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.
तेजस हे पहिले भारतीय बनावटीचे विमान आहे. ज्या वैमानिकांनी हे विमान उडवले आहे त्यांनी हे विमान उत्कृष्ट असल्याचा अहवाल दिला आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत तेजस हे मिग २१ विमानांपेक्षाही सरस असल्याचे मत माजी हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल पी. व्ही. नाईक यांनी व्यक्त केले. नाईक म्हणाले, स्वदेशी विमान बनविण्यात आपण चीनच्या तुलनेत खूप उशीर केला. कारण आपल्याकडे तंत्रज्ञान नव्हते. त्यांनी हे दुसऱ्या महायुद्धापासूनच सुरुवात केली होती. तेव्हा ३०० ते ५०० विमाने लागायची. या अनुभवातून आज ते पुढे आहेत. मात्र, उशिरा का होईना आपण सुरुवात केली ते महत्त्वाचे आहे. आपली विमानांची गरज कमी होती. यामुळे ही विमाने कोण बनवणार, तसेच संख्या कमी असल्याने खासगी उद्योगांनीही याची तयारी दाखवली नाही. आता एचएएल ही विमाने बनवत आहे. त्यांच्या समन्वयाने खासगी उद्योगही विमान निर्मितीच्या प्रक्रियेत उतरणात आहेत. भविष्यातील शस्त्रास्त्र व्यवहारासाठी हे गरजेचे आहे. सध्या भारतीय हवाई दलात राफेल विमाने येत आहे. तेसुद्धा भारतात बनतील. तेजस हे चवथ्या पिढीच्या विमान ही भारतातच बनणार असल्याने या संमिश्र तंत्रज्ञानाचा फायदा होईल. याचा फायदा येत्या १० ते १५ वर्षात होईल.
निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले म्हणाले, हा करार नुसता तेजस विमानांबद्दल नाही. यासोबत आपण मालवाहू विमाने बनवण्यासाठीही करार केला आहे. एअर बसबरोबर टाटाने यासाठी करार केला आहे. याबाबत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी नेमलेल्या एका समितीचा मी अध्यक्ष होतो. तेव्हा याबाबत मी सूचना केल्या होत्या. याला मंजुरी मिळाली आहे. याचा फायदा असा होईल एन ३२ विमाने जेव्हा निवृत्त होतील तेव्हा ही विमाने त्यांची जागा घेतील. तेजसबद्दल बोलयाचे झाल्यास बऱ्याच वर्षांपासून हे विमान आपण बनवत आहोत. मात्र, त्यांना मोठी ऑर्डर मिळत नव्हती. कारण मोठ्या ऑर्डरमुळे अनेक खाजगी कंपन्याही यात उतरायला तयार नव्हत्या. एल अॅड टी यासाठी कोईमतूरमध्ये प्रकल्प उभारत आहेत. यामुळे जवळपास वर्षाला २० विमानांची निर्मिती करण्याची क्षमता असेल. तेजस प्रकल्पात अनेक खाजगी कंपन्या असल्याने आत्मनिर्भरतेबरोबर रोजगारनिर्मिती होईल आणि विमान निर्मितीचे देशाचे काैशल्यही वाढेल. यामुळे चीनशी तुलना न करता आपल्या क्षमतावाढीबद्दल विचार करावा.
------
चौकट
सहाव्या पिढीच्या विमान निर्मितीचेही काैशल्य वाढेल
जागात प्रगत देश पाचव्या आणि सहाव्या पिढीची विमाने बनवत आहेत. तेजस हे चवथ्या पिढीचे विमान असले तरी या विमानाच्या निर्मितीमुळे आपल्याला पुढच्या पिढीची विमाने बनवायला मदत होईल. कारण भारत अवकाश तंत्रज्ञान, क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात पुढे आहे. या तंत्रज्ञानाची सांगड घालून ही विमाने बनवता येईल.
- एअर चीफ मार्शल पी. व्ही. नाईक, माजी हवाईदल प्रमुख