तेजस्विनी बसला रविवारी सुट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 02:13 PM2018-04-28T14:13:11+5:302018-04-28T14:13:11+5:30

सुट्टीच्या दिवशी गाड्यांना गर्दी कमी असल्याने बहुतेक महिला इतर बसेसने प्रवास करतात. तेजस्विनी बसेसची वाट पाहत नाहीत. त्यामुळे या बसेसला फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे पीएमपीला आर्थिक नुकसान होत आहे.

Tejaswini bus holiday on Sunday | तेजस्विनी बसला रविवारी सुट्टी

तेजस्विनी बसला रविवारी सुट्टी

googlenewsNext
ठळक मुद्देसुट्टीच्या दिवशी तेजस्विनी बसेसला महिलांचा प्रतिसाद तुलनेने खुप कमीया गाड्या आवश्यकतेनुसार सामान्य बस म्हणून मार्गावर सोडल्या जाणार मे महिन्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली जाणार

पुणे : खास महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या तेजस्विनी बससेवेला दर रविवारी सुट्टी देण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) घेतला आहे. रविवारी महिला प्रवाशांची संख्या खुप कमी असल्याने तेजस्विनी कमी प्रतिसाद मिळतो. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या रविवारपासून ही सेवा दर रविवारी बंद ठेवली जाणार आहे.
बसने प्रवास करणाऱ्या महिलांची वाढती संख्या पाहून जागतिक महिला दिनापासून खास महिलांसाठी ‘तेजस्विनी’ ही बससेवा सुरू करण्यात आली आहे. नवीन मिडी बसच्या माध्यमातून एकुण ८ मार्गांवर ३० बसेसमार्फत २१८ फेऱ्यांद्वारे ही सेवा दिली जात आहे. यापूर्वी केवळ दोनच मार्गांवर ही सेवा सुरू होती. तेजस्विनी सेवा सुरू झाल्यानंतर महिलांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. बहुतेक मार्गांवर सकाळी व सायंकाळी या बसेस असल्याने महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तेजस्विनीने प्रवास करणाऱ्या बहुतेक महिला नोकरदार किंवा विद्यार्थिनी आहेत. त्यामुळे सुट्टीचा दिवस वगळता या गाड्यांना गर्दी असते. दि. ८ मार्च ते ७ एप्रिल या महिनाभरात सुमारे २ लाख ३ हजार महिला प्रवाशांना विशेष बससेवेतून प्रवास केला आहे. 
रविवारी शाळा, महाविद्यालये तसेच शासकीय कार्यालये तसेच अनेक खासगी कार्यालयांना सुट्टी असल्याने सर्वच बसेसचा कमी प्रतिसाद मिळतो. त्यामुळे रविवारी पीएमपीकडून तुलनेने कमी बस मार्गावर सोडल्या जातात. सुट्टीच्या दिवशी बस मोकळ्या धावत असल्याने पीएमपीला आर्थिक नुकसान सहन करावे लागते. तेजस्विनी बसेसचीही हीच स्थिती आहे. दर रविवारी या बसेस महिला प्रवाशांअभावी रिकाम्या धावत असल्याचे निदर्शनास आले आहे. सुट्टीच्या दिवशी गाड्यांना गर्दी कमी असल्याने बहुतेक महिला इतर बसेसने प्रवास करतात. तेजस्विनी बसेसची वाट पाहत नाहीत. त्यामुळे या बसेसला फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे पीएमपीला आर्थिक नुकसान होत आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासनाने दर रविवारी तेजस्विनी बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या आवश्यकतेनुसार सामान्य बस म्हणून मार्गावर सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे महिलांना दर रविवारी सामान्य बसनेच प्रवास करावा लागणार आहे.
-----------
सुट्टीच्या दिवशी तेजस्विनी बसेसला महिलांचा प्रतिसाद तुलनेने खुप कमी मिळतो. त्यामुळे दर रविवारी ही सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मे महिन्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. तेजस्विनीच्या सर्व बस बंद ठेवल्या जातील. 
- दत्तात्रय माने, वाहतुक व्यवस्थापक, 
पीएमपीएमएल

Web Title: Tejaswini bus holiday on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.