तेजस्विनीचे वेळापत्रक झळकेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 07:54 PM2018-05-14T19:54:29+5:302018-05-14T19:54:29+5:30

‘पीएमपी’ने जागतिक महिला दिनापासून खास महिलांसाठी तेजस्विनी बससेवा सुरू केली. दैनंदिन प्रवास करणाऱ्या महिलांना संबंधित मार्गावरील बसेसच्या वेळा आता माहीत झाल्या आहेत. पण याच महिलांना इतर मार्गावर जायचे असल्यास त्याबाबत माहिती मिळत नाही.

Tejaswini's schedule does not show up | तेजस्विनीचे वेळापत्रक झळकेना

तेजस्विनीचे वेळापत्रक झळकेना

Next
ठळक मुद्देदोन महिने उलटले तरी प्रशासनाने अद्याप या बसेसचे वेळापत्रक संकेतस्थळ तसेच ई-कनेक्ट अ‍ॅपवर नाही

पुणे : शहरात खास महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या तेजस्विनी बससेवेला दोन महिने उलटूनही पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) संकेतस्थळ व अ‍ॅप तसेच बसथांब्यांवर वेळापत्रक झळकलेले नाही. बसस्थानकांवरही हे वेळापत्रक लावण्यात न आल्याने महिला प्रवासी बसेसच्या वेळांबाबत अंधारात आहेत.
‘पीएमपी’ने जागतिक महिला दिनापासून खास महिलांसाठी तेजस्विनी बससेवा सुरू केली. नुकताच धायरीपर्यंत एक नवीन मार्ग सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार सध्या एकुण १० मार्गांवर ३२ बसेसमार्फत ही सेवा दिली जात आहे. या मार्गांवर दररोज २३६ फेऱ्या होत असून हजारो महिलांना या सेवेचा लाभ होत आहे. महिला प्रवाशांकडूनही या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दैनंदिन प्रवास करणाऱ्या महिलांना संबंधित मार्गावरील बसेसच्या वेळा आता माहीत झाल्या आहेत. पण याच महिलांना इतर मार्गावर जायचे असल्यास त्याबाबत माहिती मिळत नाही. तसेच कधीतरी बसने प्रवास करणाऱ्या महिलाही वेळापत्रकाबाबत अनभिज्ञ आहे.
तेजस्विनी सेवा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी प्रशासनाने अद्याप या बसेसचे वेळापत्रक संकेतस्थळ तसेच ई-कनेक्ट अ‍ॅपवर टाकलेले नाही. सर्व आगारांना हे वेळापत्रक दिल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. पण बसस्थानके व थांब्यांवर मात्र याबाबत फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे इतर बसेसमधील गर्दी टाळण्यासाठी तेजस्विनीची वाट पाहणाऱ्या महिलांना ताटकळत उभे राहावे लागते. हे वेळापत्रक मुख्य बसस्थानके, आगार आणि मुख्य कार्यालयातच पाहायला मिळते. पण मार्गावरील बसथांबे, संकेतस्थळ आणि ई-कनेक्ट अ‍ॅपवर नसल्याने प्रवाशांना मार्ग व वेळांची माहिती मिळत नाही. त्यामुळे अनेक महिला प्रवासी इतर बसने प्रवास करतात.
----------
तेजस्विनी बसेसचे वेळापत्रक सर्व आगारांना देण्यात आले आहे. तसेच संकेतस्थळ व ई-कनेक्ट अ‍ॅपवरही लवकरच टाकले जाणार आहे. सध्या याबाबतचे तांत्रिक काम सुरू असल्याने विलंब लागत आहे. बसस्थानकांवरही हे वेळापत्रक लावले जाईल, असे पीएमपीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
    

Web Title: Tejaswini's schedule does not show up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.