टेकावडे खूनप्रकरणी गुंतागुंत
By admin | Published: November 19, 2015 04:53 AM2015-11-19T04:53:35+5:302015-11-19T04:53:35+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश टेकावडे यांच्या खून प्रकरणानंतर गुंतागुत वाढू शकते, याची कुणकुण लागलेल्यांच्या वर्तणुकीत बदल जाणवू लागला होता.
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश टेकावडे यांच्या खून प्रकरणानंतर गुंतागुत वाढू शकते, याची कुणकुण लागलेल्यांच्या वर्तणुकीत बदल जाणवू लागला होता. चव्हाण आणि टेकावडे यांच्यावरील खुनी हल्ल्यात साधर्म्य असल्याने पोलिसांचा त्या दिशेने तपास सुरू असताना, आणखी काही संशयित पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे चव्हाण याच्या खुनानंतर झालेला टेकावडे यांचा खून हे बदलासत्र असल्याचे संकेत मिळाले आहेत.
टेकावडे यांच्या खुनाची घटना ३ सप्टेंबर २०१५ ला घडली. याप्रकरणी काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. खुनाच्या कटातील प्रमुख सूत्रधार अमोल वहिले याच्यासह बालाजी ऊर्फ बाल्या दामोदर शिंदे, किशोर ऊर्फ गोट्या विजय भिगवणकर या दोन आरोपींना पोलिसांनी पकडले. त्यांना पिस्तूल पुरविणारा नरेंद्र शर्मा यालाही ताब्यात घेतले. पिस्तूल पुरविणारा शर्मा पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर टेकावडे यांच्या खूनप्रकरणातील तपासाला कलाटणी मिळत गेली. गुंड चव्हाण याच्यावरील हल्ल्यासाठी वापरात आलेले पिस्तूल शर्माकडूनच दिले गेले होते. टेकावडे खुनी हल्ल्यातील आरोपींना शर्मानेच पिस्तूल दिले असल्याचे उघड झाल्यानंतर शर्माशी संबंधित असलेल्यांची घाबरगुंडी उडाली. हे प्रकरण अंगाशी येऊ शकते, या भीतीपोटी काहींनी मन:शांतीसाठी पर्यटन केले, तर काहींनी स्वसंरक्षणासाठी बंदोबस्त वाढवला. याप्रकरणी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संबंध आलेल्या काहींच्या वर्तणुकीत बदल झाल्याचे जाणवले. टेकावडे खून प्रकरणातील आरोपी ताब्यात आल्यानंतरही टेकावडे यांच्या पत्नी सुजाता यांनी खुनामागे आणखी काही आरोपी असल्याचा संशय व्यक्त करणारा अर्ज पोलिसांना दिला होता. त्या दृष्टीने पोलिसांनी तपासाला गती दिली. टेकावडे,चव्हाण हल्ल्यात साधर्म्य तीन महिन्यांपूर्वीची नगरसेवक अविनाश टेकावडे यांच्यावरील खुनी हल्ल्याची घटना कामगारनेते प्रकाश चव्हाण याच्यावरील १० डिसेंबर २०१४ च्या हल्ल्याच्या घटनेशी साम्य असलेली होती. चव्हाण याच्यावर हल्लेखोरांनी पूर्णानगर येथील त्याच्या कार्यालयाजवळ हल्ला केला. आरटीओजवळील अत्यंत वर्दळीच्या परिसरात हल्लेखोरांनी डोळ्यांत मिरची पूड टाकून चव्हाण याच्यावर हल्ला केला होता. चाकूहल्ल्यासह पिस्तुलातून त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. नगरसेवक टेकावडे यांच्यावरील हल्ला घरात घुसून केला गेला. डोळ्यांत मिरची पूड टाकून चाकूहल्ला केला. पिस्तूल होते; परंतु हल्लेखोरांनी त्याचा वापर केला नाही. दोन्ही हल्ले एकाच पद्धतीने झाले. (प्रतिनिधी)
नगरसेवक अविनाश टेकावडे खून प्रकरणात ताब्यात घेतलेल्या चार संशयित आरोपींना पिंंपरी न्यायालयात बुधवारी हजर केले. न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. टेकावडे यांच्या खुनाच्या कटात सामील असल्याच्या संशयावरून पोलिसांनी रमेश लक्ष्मण चव्हाण (वय ३५, रा चिखली), बाबू ऊर्फ सूर्योदय शेखर शेट्टी (वय ३५,रा.चिंचवड), इंद्रास युवराज पाटील (वय ३८, रा. चिखली), आकाश अनिल पोटघन (वय २०, रा. मोहननगर) यांना मंगळवारी रात्री ताब्यात घेतले. बुधवारी दुपारी पिंपरी न्यायालयात त्यांना हजर केले असता, न्यायालयाने २३ नोव्हेंबरपर्यंत पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.
पंचवीस लाख रूपये तसेच सदनिका अशी टेकावडे यांच्या खूनाची सुपारी दिली होती, अशी चर्चा आहे. टेकावडे यांच्या खूनप्रकरणातील प्रमुख सूत्रधार वहिले असला तरी त्याला पुढे करणारे दुसरेच होते. टेकावडे यांच्या खुनाच्या कटात सामील असल्याच्या संशयावरून पोलिसांनी रमेश लक्ष्मण चव्हाण (वय ३५, रा. चिखली), बाबू ऊर्फ सूर्योदय शेखर शेट्टी (वय ३५, रा. चिंचवड), इंद्रास युवराज पाटील (वय ३८, रा. चिखली), आकाश अनिल पोटघन (वय २०, रा. मोहननगर) यांना ताब्यात घेतले आहे. रमेश हा प्रकाश चव्हाण याचा भाऊ, तर इंद्रास चव्हाणबरोबर माथाडी कामगार संघटनेचे काम पाहत होता. बाबू शेट्टीला ताब्यात घेतले आहे.