तेलंगणात १ लाखाचे बक्षीस असलेली टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:21 AM2021-02-21T04:21:47+5:302021-02-21T04:21:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तेलंगणा राज्यात चोरी, घरफोडी करणाऱ्या व १ लाखांचे बक्षीस जाहीर असलेल्या गुन्हेगारांच्या टोळीला विश्रांतवाडी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : तेलंगणा राज्यात चोरी, घरफोडी करणाऱ्या व १ लाखांचे बक्षीस जाहीर असलेल्या गुन्हेगारांच्या टोळीला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. विश्रांतवाडी येथे घरफोडी करुन १० लाख ८१ हजार रुपयांचा ऐवज चोरुन ही टोळी पळून गेली आहे.
हुसेन शिवाजी गायकवाड (वय ४५, रा. सोलापूर), आदर्श अरुण गायकवाड (वय २४, रा. सोलापूर), लक्ष्मण गुरप्पा हेळवार (वय २२, रा. कर्नाटक), राज दत्ता जाधव (वय २६, रा. ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सर्व आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांनी गुलबर्गा, सोलापूर व तेलंगणा राज्यातील विविध ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. अशाप्रकारचे टोळीवर ३० ते ४० गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
विश्रांतवाडी परिसरात २४ जानेवारी रोजी १० लाख ८१ हजार ४८४ रुपयांचे दागिने घरफोडी करुन चोरुन नेण्यात आले होते. या गुन्ह्याचा तांत्रिक विश्लेषण करताना तपासादरम्यान पांढर्या रंगाच्या एक्सयुव्ही कारमधून आरोपी येरवडा, हडपसरमार्गे सोलापूरकडे पळाल्याचे निष्पन झाले होते. या गाडीच्या क्रमांकावर ती हुसेन गायकवाड याची असल्याचे समजले. तसेच गायकवाड याच्यावर कर्नाटक व सोलापूर भागात ३० ते ४० चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस हवालदार दीपक चव्हाण, संदीप देवकाते, शेखर खराडे, प्रफुल्ल मोरे, अझरुद्दीन पठाण यांनी आरोपींची माहिती काढली. सोलापूर जिल्ह्यातील हैद्रा येथे सापळा रचून पोलिसांनी गाडी व या टोळीला पकडले. त्यांच्याकडून ९ लाख ८३ हजार ८४८ रुपयांचा ऐवज व गाडी जप्त केली आहे.
ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त पंकज देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय चांदखेडे, मनिषा झेंडे कर्मचारी प्रफुल्ल मोरे, सतीश मुंडे, शेखर खराडे, अनिकेत भिंगारे यांच्या पथकाने केली.