जेजुरी परिसरात दूरध्वनीसेवा ठप्प
By admin | Published: December 30, 2014 10:49 PM2014-12-30T22:49:07+5:302014-12-30T22:49:07+5:30
जेजुरी नगरपालिका आणि बीएसएनएल यांच्या भोंगळ कारभारामुळे शहरातील दूरध्वनीसेवा खंडित झालेली असून, ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
जेजुरी : जेजुरी नगरपालिका आणि बीएसएनएल यांच्या भोंगळ कारभारामुळे शहरातील दूरध्वनीसेवा खंडित झालेली असून, ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वारंवार तक्रारी-विनंत्या करूनही सेवा सुरळीत होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
जेजुरी शहरात नगरपालिकेतर्फे गेल्या सहा महिन्यांपासून रस्तेदुरूस्ती, तसेच गटारे बांधकामाची कामे सुरू आहेत. जेसीबी यंत्राच्या साहाय्याने रस्ते खोदण्यात येत असल्याने भूमिगत दूरध्वनीच्या केबल तुटल्या आहेत. जमिनीखालून, तसेच गटारातून बीएसएनएलच्या केबल गेलेल्या असल्याने दररोज विविध भागांतील टेलिफोन व इंटरनेट सेवा खंडित होत आहेत. यामुळे सुविधा असूनही उपयोग होत नाही. वारंवार केबल तुटल्याने महिन्यातून १० ते १५ दिवस सेवा बंदच राहते. तरीही बिले भरावीच लागत असल्याने ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. खंडोबा मंदिर पायथ्यालगतच्या ग्राहकांनी या त्रासाला कंटाळून इतर सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे. बीएसएनएल नको रे बाबा, अशीच प्रतिक्रिया शहरातून उमटत आहे. गेल्या तीन दिवसांपासून केबल तुटण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. यामुळे ग्राहकांत प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
बीएसएनएलकडे तक्रार केली असता, केबल तुटली आहे, केबल शोधत आहोत, अशीच उत्तरे मिळत आहेत. पालिकेचे काम सुरू असल्याने केबल तुटत आहेत. ते परस्परच काम करतात, यामुळे केबल तुटल्याचे आम्हाला समजत नाही. तेथील काम पूर्ण झाल्याशिवाय दुरुस्ती ही शक्य नाही, अशी कारणे ग्राहकांना दिली जात आहेत. पालिकेकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास याची जबाबदारी बीएसएनएलची आहे, असेच उत्तर देण्यात येत आहे.
ग्राहक मंचाकडे करणार तक्रार
४ ठेकेदाराकडून केबल तुटल्या जातात. त्यांना सूचना देण्यासाठी जेजुरी पालिकेतील या विभागाच्या अभियंत्याची बदली झाल्याने दखल घ्यायलाही कोणीच नाही. पत्र वा अर्ज दिल्यास त्याला केराची टोपली दाखवली जात आहे. यामुळे ग्राहकांनी जेजुरी नगरपालिका आणि बीएसएनएल कडून झालेल्या मनस्तापाबाबत, तसेच दूरध्वनी सेवा खंडित असतानाही वसूल केलेल्या बिलाबाबत नुकसानभरपाई मिळवण्यासाठी ग्राहक मंचाकडे तक्रार घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे.