वीजबिल न भरल्याने वीस गावांतील टेलिफोन सेवा रात्री बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:52 AM2019-01-10T00:52:59+5:302019-01-10T00:53:20+5:30
महाप्रबंधकांकडे तक्रार : उंडवडी, गोजुबावीसह वीस गावांतील ग्रामस्थ त्रस्त
बारामती : बीएसएनएल कंपनीकडून गावागावात असलेल्या युनीटने गेल्या अनेक महिन्यांपासून वीजबील भरले नाही त्यामुळे बीएसएनलच्या युनीटला पुरविण्यात आलेली वीज महावितरण कंपनीने खंडीत केली. त्यामुळे बारामती तालुक्यातील सुमारे वीस पेक्षा अधिक गावातील बीएसएनएलचे युनीट बंद झाले आहे. केवळ सकाळी अकरा ते सायंकाळी सहा पर्यंत जनरेटवरवर वीज असल्याने रात्री आणि सकाळी मोबाईल सेवा बंद झाली आहे. याबाबत उंडवडी आणि गोजुबावी येथील नागरिकांनी बीएसएनच्या सहाय्यक महाप्रबंधकांकडे तक्रार केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून उंडवडी व गोजुबावी येथील बी एस एन एल याशासकीय कंपनीनेने गेल्या तीन महिन्यांपेक्षा अधिक काळातील वीज बील भरला नाही. त्यामुळे या दोन्ही गावातील बीएसएनएल युनीटचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे जनरेटर आणि बॅटरीवर येथील युनीट चालविले जाते. त्यामुळे केवळ सकाळी ११ ते संध्याकाळी ६ या वेळेतच सेवा युनीटमधील मशीन चालू होतात आणि त्याच वेळी मोबाईल सेवा सुरु होते. या गोष्टीला कंटाळून गोजुबावी येथील रहिवासी आणि कर सल्लागार वनपाल नारायण एतकाळे यांनी बीएसएनउलच्या सहाय्यक महाप्रबंधकांकडे तक्रार दिली आहे. गावात कोणत्याच कंपनीचे नेटवर्क चालत नसल्याने त्यांनी बी एस एन एल कंपनीची दुरध्वनी सेवा आणि इंटरनेटसेवा घेतली आहे. महिन्याला येणारे टेलीफोन बिल देखील त्यांनी वेळेवर भरले आहे. तरीही त्यांना २४ तास सेवा मिळत नाही. त्यामुळे त्यांनी सुरवातीला एमआयडीसी आॅफिस मध्ये अनेकदा तक्रार केली . तेथे त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यामुळे अखेर कंटाळून त्यांनी सहाय्यक महाप्रबंधकांकडे तक्रार केली आहे.
...तर आमचे लग्न व्हायचे राहायचे
४बीएसएनएलच्या विस्कळीत सेवेमुळे त्रस्त झालेल्या एका तरुणाने तर बीएसएनएलच्या अधिकाऱ्याला मेसेज करून सेवा पुर्ववत करण्याविषयी साकडे घातले आहे. साहेब तुम्हाला विनंती आहे, काहीतरी करा. लग्नकार्य जमवायाचे दिवस आहेत.
४पाहुण्यारावळ्यांचे फोन येतात, फोन नाही लागला तर आमचे लग्न व्हायचे राहायचे. लाईन लवकर दुरुस्त करा, अशी तुम्हाला कळकळीची विनंती येथील एका तरुणांने केली आहे.
४दुरध्वनी आणि नेटवर्क विस्कळीत असल्याने छोटे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. बंदच्या काळातच ग्राहक असतात रिचार्ज करणे, सगळ्या प्रकारच्या इ सेवा केंद्राबबरोबर मोबाईलवर चालणारे आर्थिक व्यवहारही केवळ नेटवर्क प्रोब्लेममुळे ठप्प झाले झाल्याची तक्रार नारायण एतकळे यांनी केली.
वीज बील भरण्यासाठी वरिष्ठ कार्यालयातून विजबीलासाठी पूर्वी निधी मिळत होता. गेल्या काही महिन्यापासून हा निधी मिळाला नसल्याने वीज बील थकले आहे. त्यामुळे विजमंडळाकडून वीज पुरवठा खंडीत केला. सध्या बीएसएनएलकडे असलेल्या इंजिनावरच सकाळी अकरा ते सहा या वेळेत वीज पुरवठा उपलब्ध होत असल्याने त्याचवेळेत बीएसएनएलची टेलीफोन आणि इंटरनेट सेवा दिली जात आहे.
- एस. ए. भगत,
अधिकारी, बीएसएनल एमआयडीसी