सांगा, आम्ही खेळायचं कुठं?
By admin | Published: October 14, 2016 05:13 AM2016-10-14T05:13:05+5:302016-10-14T05:13:05+5:30
लहान मुलांना खेळण्यासाठी हक्काचे ठिकाण मिळावे, यासाठी आळंदी नगर परिषदेतर्फे उभारण्यात आलेल्या शहरातील हरिपाठ बाल उद्यानाची देखरेखीअभावी
आळंदी : लहान मुलांना खेळण्यासाठी हक्काचे ठिकाण मिळावे, यासाठी आळंदी नगर परिषदेतर्फे उभारण्यात आलेल्या शहरातील हरिपाठ बाल उद्यानाची देखरेखीअभावी दुरवस्था झाली आहे. उद्यानात जागोजागी गवत उगवले आहे तसेच तेथे असलेल्या खेळण्यांच्या साहित्याचीही मोडतोड झाल्याने ‘आम्ही खेळायचं कुठं?’ असा प्रश्न चिमुकल्यांना पडला आहे.
वीस-पंचवीस हजार लोकसंख्या असलेल्या आळंदी शहरात नव्या एकाही ठिकाणी पालिकेच्या वतीने उद्यान तसेच विरंगुळा केंद्र उभारण्यात आले नाही. चऱ्होली रस्त्यावर काही वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या हरिपाठ बाल उद्यानाची देखभाल-दुरुस्तीअभावी दुरवस्था झाली आहे. येथील खेळणी तुटल्यानंतर तेथील स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून नवीन खेळणी बसविली होती. परंतु, काही काळानंतर त्यांचीही दुरवस्था झाली. मैदानात गवताचे साम्राज्य पसरले आहे. मैदानाच्या कडेला उभारण्यात आलेले ज्येष्ठ नागरिकांसाठीचे गप्पाटप्पा केंद्रही टाळे लावलेल्या अवस्थेत आहे. येथे असलेले स्वच्छतागृहही बंद पडले आहे. लहान मुलांसाठी उभारण्यात आलेल्या झोका, घसरगुंडीची तर तोडफोड झाली असून हे बाल-उद्यान रात्रीच्या वेळी तळीरामांचा हक्काचा अड्डा बनला आहे. वीजपुरवठाही खंडित झाला असून, रात्रीच्या वेळी उद्यानात अंधाराचे साम्राज्य असते. खेळण्यांच्या साहित्याला गंज चढला असून त्याच गंजलेल्या घसरघुंडी-झोपाळ्यावर लहानग्यांना झुलावे लागते. अवघ्या पंधरा ते वीस दिवसांवर दिवाळी आहे. काही दिवसांतच शाळांना सुटी लाग्ेल. सुटीत लहान मुलांची ओढ उद्यानाकडे असणारच, तेव्हा त्यांना या दुरवस्थेचा सामना करावा लागू नये, याकरित पालिकेने उद्यानातील वाढलेले गवत काढून तुटलेल्या खेळण्यांची दुरुस्ती करावी, सुंदर फुलझाडांची लागवड करावी, अशा मागण्या नागरिक करीत आहेत. याबाबत नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. संतोष टेंगले, नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले, की उद्यानदुरुस्तीबाबत खर्चाचे अंदाजपत्रक काढण्यात आले आहे. लवकरच ते मंजूर करून काम सुरू करण्यात येईल. नागरिकांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न असला, तरी दिवाळी नंतरच काम मार्गी लागेल.