"आपल्या सभोवतालच्या घटना चित्रपटातून मांडा", दिग्दर्शिका मीरा नायर यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 08:34 PM2021-09-28T20:34:57+5:302021-09-28T20:35:08+5:30
चित्रपट निर्मिती हा माझ्यासाठी एक आजार असल्यासारखे आहे. तो काही केल्या सुटत नाही.
पुणे : आपल्या सभोवती जे घडते किंवा आपण जे अनुभवतो तीच कथा चित्रपटात मांडायला हवी. कारण वास्तव मांडायला धाडस लागते. आपण स्वत:ची कथा सांगितली नाही तर ती कुणीही सांगणार नाही. सत्य हे काल्पनिकतेपेक्षा प्रभावी असते, असे मत ’वॉटर’, ‘मान्सून वेडिंग’ चित्रपटाच्या दिग्दर्शिक मीरा नायर यांनी व्यक्त केले. ‘चित्रपट निर्मिती हा माझ्यासाठी एक आजार असल्यासारखे आहे. तो काही केल्या सुटत नाही. माझ टोपण नाव म्हणूनच ‘मँड गर्ल’ असे आहे. काहीतरी वेगळं करण्यासाठी वेडच असावं लागते असेही त्या म्हणाल्या.
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूचा २३ वा पदवीप्रदान सोहळा मंगळवारी ऑनलाइन माध्यमातून पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
''वडील प्रशासकीय अधिकारी होते. त्यांच्या नोकरीच्या निमित्ताने विविध प्रांत,तेथील संस्कृती, विविधता जवळून अनुभवायला मिळाली. जत्रांमधून प्राचीन कथा कानावर पडत गेल्या. त्याची राजकीय बाजू देखील उमगत गेली. सत्यजित रे आणि ऋत्विक घटक यांचे चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपटांकडे पाहाण्याची दृष्टी विकसित होत गेली, असे सांगून मीरा नायर म्हणाल्या, मला देशाचा सांस्कृतिक दूत व्हायचे नव्हते ना मला टिपीकल बॉलिवूडसारखे चित्रपट करायचे होते. मला स्वत:चे वेगळे असे काहीतरी मांडायचे होते. त्यामुळे बॉलिवूडसाठी मी बाहेरची होते. ‘धोबी का कुत्ता ना घरका ना घटका’ अशी माझी स्थिती होती. ‘सलाम बॉम्बे’ चित्रपटात रस्त्यावरील मुलांचे जगणे, त्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. कला जग बदलू शकते का? असा प्रश्न पडल्यानंतर त्याचे उत्तर ‘हो’ असे मिळाले. चित्रपटाच्या निमित्ताने एक फौंडेशन उभी राहिली आणि शासनाने रस्त्यावरील मुलांच्या पुनर्वसनासाठी धोरण आखले. तेव्हा चित्रपट हे प्रभावी माध्यम असल्याची ख-या अर्थाने जाणीव झाली.
सौंदर्य आणि वास्तव याचा कलेमध्ये समावेश करा
''गेल्या ४० वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीमध्ये तीन गोष्टी आवर्जून शिकले. जे काम हाती घ्यायचे ते तडीस नेले पाहिजे. चित्रपटाच्या कथानकासाठी कुणाकडूनही अगदी वॉचमनसारख्या व्यक्तींकडूनही प्रेरणा मिळू शकते. केवळ स्वत:ची दृष्टी विकसित करून बुद्धधीचा वापर करायला हवा आणि कलाविश्व समृद्ध करायला हवे असे सांगत नायर यांनी सौंदर्य आणि वास्तव याचा कलेमध्ये समावेश करून पुढील वाटचाल करा असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.''