टेंभूर्णी ते लातूर रस्ता अडकला लालफितीत : मार्ग पूर्ण झाल्यास वेळ आणि पैसे वाचणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 11:41 AM2019-05-13T11:41:02+5:302019-05-13T11:52:43+5:30
मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा महत्त्वाचा रस्त्या म्हणून टेंभूर्णी ते लातूर रस्त्याच्या प्रस्ताव तयार करण्यात आला.
पुणे: मराठवाड्यातून लहान मोठ्या कामासाठी पुण्यात येणा-या मजूरांना अहमदनगर मार्गे किंवा सोलापूर मार्गे लांबचा प्रवास करावा लागतो. मात्र, टेंभूर्णी ते लातूर मार्ग पूर्ण झाल्यास या मजूरांचा वेळ आणि पैसे वाचणार आहेत. परंतु, सुमारे तीन वर्षांपासून या रस्त्याची फाईल केंद्र शासनाकडे पडून आहे. रस्त्याच्या अंतिम मंजूरीची प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षात कामाला सुरूवात व्हावी,यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिका-यांना केंद्राकडे खेटे मारावे लागत आहेत.
मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा महत्त्वाचा रस्त्या म्हणून टेंभूर्णी ते लातूर रस्त्याच्या प्रस्ताव तयार करण्यात आला. त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे या रस्त्याच्या मंजूरीचा प्रस्ताव तीन वर्षांपूर्वी पाठविण्यात आला. परंतु, गेल्या तीन वर्षात या रस्त्याच्या मंजूरीबाबत कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणातून अनेक वेळा या रस्त्याच्या कामास लवकरच सुरूवात केली जाईल, असे आश्वासन दिले. परंतु, अद्याप या रस्त्याच्या कामाला गती मिळालेली नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मराठवाड्यातून पुणे व परिसरात येणा-या दुष्काळग्रस्तांना सुमारे शंभर किलो मिटरचा अधिकचा प्रवास करून यावे लागत आहेत, असे एमएसआरडीसीच्या अधिका-यांनी सांगितले.
टेंभूर्णी ते लातूर हा सुमारे 165 कि.मि.चा रस्ता तीन जिल्ह्यातून जाणार आहे.त्यासाठी अकराशे कोटी रुपये प्रस्तावित केले आहे. वर्षातील सुमारे पाच महिने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर मजूरांची वाहतूक होत असते. बीड, लातूर आदी भागातून कारखान्यासाठी मोठ्या प्रमाणावर मजूर याच रस्त्याने पुण्याकडे ये-जा करतात. त्यामुळे टेंभूर्णी ते लातूर रस्त्याचे काम होणे गरजेचे आहे. सातारा- म्हसवड - टेंभूर्णी - कुरूडवाडी - बार्शी - लातूर असा हा रस्ता प्रस्तावित केला आहे. सोलापूरसाठी हा रस्ता महत्त्वाचा ठरणार आहे. सत्ताधारी राजकीय नेत्यांनी या रस्त्याचा उल्लेख आपल्या भाषणांमधून अनेक वेळा केला. परंतु,रस्त्याच्या कामास प्रत्यक्षात सुरूवात व्हावी,यासाठी कोणीही प्रयत्न केले नाही,असेही एमएसआरडीसीच्या अधिका-यांनी सांगितले.