Temghar Dam | टेमघर धरणाची गळती ९६ टक्क्यांपर्यंत घटली पण अडीच वर्षांपासून कामेही रखडली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 01:04 PM2023-03-18T13:04:32+5:302023-03-18T13:05:28+5:30

गळती रोखण्याच्या कामांकरिता ९९ कोटी व धरण सुरक्षितता कामांसाठी ९५ कोटी ५७ लाख रुपये प्रस्तावित आहे...

Temghar Dam's leakage reduced to 96 per cent but work also stalled for two-and-a-half years | Temghar Dam | टेमघर धरणाची गळती ९६ टक्क्यांपर्यंत घटली पण अडीच वर्षांपासून कामेही रखडली

Temghar Dam | टेमघर धरणाची गळती ९६ टक्क्यांपर्यंत घटली पण अडीच वर्षांपासून कामेही रखडली

googlenewsNext

पुणे : टेमघर धरणाची गळती ९६ टक्क्यांपर्यंत कमी झाली असली तरी गेल्या अडीच वर्षांपासून हे काम सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी रखडले असल्याची माहिती जलसंपदामंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिली. गळती रोखण्याच्या कामांकरिता ९९ कोटी व धरण सुरक्षितता कामांसाठी ९५ कोटी ५७ लाख रुपये प्रस्तावित आहे. हा प्रस्ताव सरकारला प्राप्त झाला असून प्रस्तावावर कार्यवाही करण्यात येत आहे, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

विधिमंडळात याबाबत आमदारांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी ही माहिती दिली. टेमघर धरणाची गळती रोखण्यासाठी दुरुस्तीच्या कामावर ९१ कोटी ६६ लाख रुपये खर्च झाला आहे. या धरणाच्या एकूण कामाकरिता आतापर्यंत ४५६ कोटी ५८ लाख रुपये इतका खर्च झाला आहे. २०१६-१७ मध्ये गळतीचे प्रमाण २ हजार ५८७ लिटर प्रति सेकंद एवढे होते. दुरुस्तीच्या कामामुळे गळतीच्या प्रमाणात ९६ टक्के इतकी लक्षणीय घट झाली असून गळतीचे प्रमाण १९७ लिटर प्रति सेकंद एवढे आढळून आले असल्याची माहितीही त्यांनी दिली. तर सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी दुरुस्तीचे काम जुलै २०२० पासून थांबविण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

धरणातून २०१० पासून गळती सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर दुरुस्ती करण्यासाठी निधीची मागणी करण्यात आली. गळती रोखण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीच्या मार्गदर्शनाखाली कामे सुरू करण्यात आली होती. ही कामे १०० टक्के पूर्ण करण्यासाठी चालू निविदेतील ५२.९५ कोटी रुपये व अद्याप निविदा निश्चित न झालेल्या कामासाठी ४६.०८ कोटी अतिरिक्त निधीची आवश्यक आहे. तसेच धरणाच्या सुरक्षिततेसाठी ९५ कोटी ५७ लाख रुपये प्रस्तावित आहे. हा प्रस्ताव सरकारला प्राप्त झाला आहे. यासाठी द्वितीय प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पाची उर्वरित कामे तातडीने हाती घेण्याचे नियोजित असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

टेमघर धरणाची तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ६ ऑगस्ट २०१६ मध्ये व ३१ ऑगस्ट २०१९ मध्ये पाहणी केली असून त्यांना धरणामध्ये गळती होत असल्याचे निदर्शनास आले होते. तसेच, टेमघर धरण गळती प्रतिबंधक कामे हाती घेतल्यानंतर मार्गदर्शनासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीच्या एकूण १० पाहणी दौरे व बैठका झाल्या असून गळती प्रतिबंधक कामांबाबत तज्ज्ञ समितीने समाधान व्यक्त केले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Web Title: Temghar Dam's leakage reduced to 96 per cent but work also stalled for two-and-a-half years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.