टेमघर धरणाची गळती आटोक्यात : यंदाच्या हंगामात धरण पूर्ण क्षमतेने भरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 09:13 PM2019-07-16T21:13:07+5:302019-07-16T21:21:57+5:30

टेमघर धरणातील भेगा बुजविण्याचे (ग्राऊटींग) बहुतांश काम पूर्ण झाल्याने गळती ९० टक्के आटोक्यात आली आहे. त्यामुळे यंदा दोन वर्षांनी धरणात शंभरटक्के पाणी साठा करण्यात येणार आहे.

Temham Dam leakage: In the current season the dam will be filled with full capacity | टेमघर धरणाची गळती आटोक्यात : यंदाच्या हंगामात धरण पूर्ण क्षमतेने भरणार

टेमघर धरणाची गळती आटोक्यात : यंदाच्या हंगामात धरण पूर्ण क्षमतेने भरणार

Next

पुणे : टेमघर धरणातील भेगा बुजविण्याचे (ग्राऊटींग) बहुतांश काम पूर्ण झाल्याने गळती ९० टक्के आटोक्यात आली आहे. त्यामुळे यंदा दोन वर्षांनी धरणात शंभरटक्के पाणी साठा करण्यात येणार आहे. धरणाच्या सांध्यातून काही प्रमाणात गळती होत असली तरी, ती काळजी करण्यासारखी नाही. पुढील वर्षी (जून २०२०) संपूर्ण काम होईल, अशी माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी दिली. 
मुळशी तालुक्यातील मुठा गावाजवळ मुठा नदीवर हे धरण बांधले आहे. २००१ सालापासून त्यात पाणी साठविले जात आहे. तर, २०११ पासून पूर्ण क्षमतेने पाणी साठविले जात आहे. या धरणाची साठवण क्षमता पावणेचार अब्ज घनफूट (टीएमसी) आहे. पुणे शहराची साडेतीन महिन्यांची तहान यात भागू शकते. दोन वर्षांच्या खंडानंतर धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठविणार असल्याचे वृत्त लोकमत आॅनलाईनवर सर्व प्रथम प्रसिद्ध झाले होते. या धरणाच्या कामाची माहिती देण्यासाठी जलसंपदा विभागाने मंगळवारी (दि. १६) धरणाचा पाहणी दौरा आयोजित केला होता. त्यात जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी लोकमतच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केले. 
गेल्या दोन वर्षांपासून धरणाच्या भेगा बुजविण्याचे आणि धरणाला मजबुती आणण्याचे काम सुरु आहे. गेल्या वर्षी धरणात क्षमतेच्या निम्मा साठा करण्यात आला होता. कामासाठी गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यातच धरण रिकामे करण्यात आले होते. ग्राऊटींड (भेगा बुजविणे) व पॉलिफायबर रिइन्फोर्स शॉर्र्टफिट या तंत्राच्या आधारे भेगा बुजविणे आणि धरणाला मजबुती देण्याचे काम करण्यात येत आहे. यातील भेगा बुजविण्याचे काम ८५ टक्के पूर्ण झाले असून, पॉलिफायबर तंत्रज्ञानाने करण्यात येणारे मजबुतीचे काम १० टक्के झाले आहे. भेगा बुजविण्याचे मुख्य काम बहुतांश प्रमाणात झाले असल्याने धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठविण्यात येईल. पुढील वर्षी मॉन्सून पूर्वी उरलेले कामही होईल. तसेच, देखभाल दुरुस्तीचे हे काम पुढील ५० वर्षे टिकेल, असे कार्यकारीय अभियंता एस. व्ही. प्रदक्षणे म्हणाले.

काय आहे ग्राऊटींग  
धरणातील भेगा बुजविण्यासाठी सिमेंट कॉंक्रीटमधे प्लाय अ‍ॅश, सिलिका, प्लॅस्टीसायझर आणि या सर्वांना एकत्रित बांधण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या रसायनाचा वापर केला जातो. उच्चदाबाने हे मिश्रण भेगांमधे भरले जाते. या मुळे गळती थांबते. केंद्रीय पॉवर अ‍ॅण्ड रिसर्च स्टेशन आणि जलसंपदा विभााने या कामाचा आरखडा बनिवला असून, त्याच्या चाचण्या देखील घेतल्या आहेत. 

पॉलिफायबर तंत्रज्ञानाने होणार हा फायदा
पॉलिफायबर रिइन्फोर्समेंट तंत्रज्ञानाचा वापर करुन कॉँक्रीटमधे पॉलिप्रोपेलिन फायबर वापरले जाते. भिंतीला अनेक सूक्ष्म छिद्रे असतात. भविष्यात ती छिद्रे मोठी होऊन गळतीचा धोका वाढतो. त्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करुन लहान छिद्रे बुजविली जातात. त्यामुळे धरणाच्या मजबुतीमधे वाढ होते. या तंत्रज्ञानाचा देशात प्रथमच वापर येथे करण्यात येत आहे.
 
टेमघर धरणातून होत होती ३३पट अधिक गळती 
दुरुस्तीचे काम होण्यापूर्वी टेमघर धरणामधून सेकंदाला तब्बल अडीच हजार लिटर पाण्याची गळती होत होती. धरणातील गळतीचे हे प्रमाण तब्बल तेहतीसपट अधिक होते. प्रत्येक धरणातून पाझर अथवा गळती काही प्रमाणात होतच असते. धरणाचा प्रकार, लांबी, उंची आणि पाणी साठविण्याची क्षमता या नुसार गळतीचे सामान्य प्रमाण किती असते, हे ठरविले जाते. या नुसार टेमघरमधे ७५ लिटर प्रतिसेकंद पाण्याची गळती, सामान्य ठरते. त्या पेक्षा ही गळती कितीतरी अधिक होती. आत्ता झालेल्या ग्राऊटींगच्या कामानंतर ही गळती दोनशे लिटर प्रतिसेकंद पर्यंत कमी होईल, असा अंदाज आहे. संपूर्ण काम झाल्यानंतर गळती ७५ लिटर प्रतिसेकंदच्या मर्यादेत येईल.

धरणातून होणारी गळती 
वर्ष - गळतीचे प्रमाण 
२००९- प्रति सेकंद ५०८ लिटर 
२०१६ - प्रति सेकंद २ हजार ५८७ लिटर 
२०१७- प्रति सेकंद १ हजार ३९ लिटर 
२०१८- प्रति सेंकद ४१३ लिटर 

असे आहे टेमघर धरण
धरणाचा प्रकार दगडी
धरणाची लांबी १०७५ मीटर
धरणाची अधिकतम उंची ८६.६५ मीटर
पाणीसाठवण क्षमता ३.८१ टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा ३.७० टीएमसी
पाणी वापर शहराला पिण्यासाठी
सिंचन मुळशी तालुक्यातील १ हजार हेक्टर   

Web Title: Temham Dam leakage: In the current season the dam will be filled with full capacity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.