येत्या रविवारपासून तापमानात होणार घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:11 AM2021-01-22T04:11:05+5:302021-01-22T04:11:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दर वर्षी जानेवारीमध्ये थंडीचा कडाका अनुभवणाऱ्या महाराष्ट्रात यंदा घामाच्या धारांचा अनुभव घ्यावा लागत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दर वर्षी जानेवारीमध्ये थंडीचा कडाका अनुभवणाऱ्या महाराष्ट्रात यंदा घामाच्या धारांचा अनुभव घ्यावा लागत आहे. दक्षिणपूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अडथळा निर्माण झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या रविवारी २४ जानेपासून राज्यातील तापमानात घट होण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. गुरुवारी राज्यात नाशिक येथे सर्वात कमी तापमान ११.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, सध्या दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा सध्या जोर आहे. तसेच पश्चिम बंगालच्या उपसागरावरुन दक्षिणेकडून बाष्पयुक्त वारे उत्तरेकडे जात आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणार्या थंड वारे रोखले गेले आहेत. त्यामुळे राज्यातील तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे. उद्या शुक्रवारी तापमानात काहीशी घट झाल्यानंतर शनिवार, रविवारी पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तीन दिवस तापमानात पुन्हा घट होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या बऱ्याच भागात किंचित वाढ झाली आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) :
मुंबई २०.५, सांताक्रुझ १८.२, रत्नागिरी १९.३, पणजी २१.२, डहाणु १७, जळगाव १२, कोल्हापूर १९, महाबळेश्वर १३.४, मालेगाव १४.६, नाशिक ११.४, सांगली १८.४, सातारा १६, सोलापूर १८.४, औरंगाबाद १५.५, परभणी १७.५, नांदेड २०, बीड १७.३, अकोला १५.७, अमरावती १७.५, बुलढाणा १५.५, ब्रम्हपूर १५.९, चंद्रपूर १७.८. गोंदिया १४, नागपूर १६, वाशिम १७.८.