उन्हाच्या तडक्याची फळभाज्यांना फोडणी, आवक, मागणी आणि दरही घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 12:39 AM2018-04-09T00:39:24+5:302018-04-09T00:39:24+5:30

गेल्या काही दिवसांत उन्हाचा कडाका प्रचंड वाढला असून, याचा फटका फळभाज्या व पालेभाज्यांना बसला आहे.

Temperatures of summer sunglasses are reduced in tempera, arrivals, demand and rates | उन्हाच्या तडक्याची फळभाज्यांना फोडणी, आवक, मागणी आणि दरही घटले

उन्हाच्या तडक्याची फळभाज्यांना फोडणी, आवक, मागणी आणि दरही घटले

googlenewsNext

पुणे : गेल्या काही दिवसांत उन्हाचा कडाका प्रचंड वाढला असून, याचा फटका फळभाज्या व पालेभाज्यांना बसला आहे. यामुळे मार्केट यार्डातील तरकारी विभागातील आवक घटली असून, भाज्यांची मागणीदेखील कमी झाली आहे. मागणी कमी झाल्याने दर देखील कमी झाले आहे. याचा फटक राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. आवकच्या तुलनेत मागणी घटल्याने आले, घेवडा आणि मटारच्या दरात वाढ झाली आहे, तर गवार आणि भेंडीच्या दरात घट झाली आहे.
इतर सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत. गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवार (दि. ८) रोजी १५० ट्रक शेतमालाची आवक झाली. यामध्ये परराज्यातून गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून तब्बल १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, हिमाचल प्रदेशमधून १ ट्रक मटार, कर्नाटक, गुजरात येथून ३ ते ४ ट्रक कोंबी, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ४ ते ५ ट्रक शेवगा, राज्यस्थानातून ३ ट्रक गाजर, कर्नाटक येथून ५ ते ६ टेम्पो तोतापुरी कैरी, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाच्या ४ ते ५ गोणी आवक झाली आहे.
तर महाराष्ट्रातून सातारी आले ७०० ते ८०० पोती, टोमॅटो साडे पाच ते सहा हजार पेटी, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी १४ ते १५ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, मटार २०० ते २५० गोणी, भेंडी १० ते १२ टेम्पो, ढोबळी मिरची १४ ते १५ टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, गावरान कैरी ८ ते १० टेम्पो, चिंच २५ ते ३० पोती, कांद्याची १२० ट्रक, आग्रा, इंदौर, नाशिक आणि तळेगाव येथून नवीन बटाट्याची ५५ ते ६० ट्रक इतकी आवक झाली.
रसदार फळांची मागणी वाढली
उन्हाच्या तीव्रतेमुळे कलिंगड, खरबूज, डाळींब, संत्री आणि मोसंबी या रसदार फळांची मागणी बाजारात वाढली आहे. आवक व मागणी कायम असल्याने सध्या फळांचे दर स्थिर आहेत, तर मागणीअभावी पपई, सफरचंद, पेरूच्या दरात १० ते २० टक्क्यांनी घट झाली आहे. द्राक्षांचा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने दरामध्ये दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.
उन्हामुळे पालेभाज्या तेजीत
उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे गेल्या काही दिवसांत पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत मुळे, चवळई, पालक वगळता पालेभाज्यांच्या दरातील तेजी टिकून आहे. पालेभाज्यांचे वाढलेले दर कायम असल्याने किरकोळ बाजारात पालेभाज्यांची चढ्या भावाने विक्री होत आहे. कोथिंबिरीच्या जुडीला घाऊक बाजारात ३ ते १२ रुपये मोजावे लागत आहेत आहे. किरकोळ बाजारात १० ते २५ रुपये भावाने जुडीची विक्री होत असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली. रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबिरीची सुमारे १ लाख २५ हजार, तर मेथीची १५ हजार जुडींची आवक झाल्याचे सांगण्यात आले.
फुलाची मागणी कमी
बदलत्या हवामानामुळे जिल्ह्याच्या विविध भागातून मार्केट यार्डातील फूलबाजारात सर्वच प्रकारच्या फुलांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु, सध्या सण, लग्नसराईचा सीझन थंडावला असल्याने फुलांच्या मागणीमध्ये घट झाली आहे. यामुळे फुलांच्या दरामध्ये १० ते २० टक्क्यांची घट झाली आहे.

Web Title: Temperatures of summer sunglasses are reduced in tempera, arrivals, demand and rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.