Maharashtra Winter: महाराष्ट्रात आठवडाभर तापमाने वाढणार, थंडी कमी होणार! काही ठिकाणी पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 01:28 PM2024-12-02T13:28:18+5:302024-12-02T13:29:20+5:30
महाराष्ट्रात दि. २ ते ४ डिसेंबर असे तीन दिवस केवळ ढगाळ वातावरण राहून, झालाच तर अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे
पुणे: राज्यातील थंडी कमी होणार असून, या आठवड्यात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. महाराष्ट्रात दि. २ ते ४ डिसेंबर असे तीन दिवस केवळ ढगाळ वातावरण राहून, झालाच तर अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते, अशी माहिती सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
गेल्या आठवड्यात राज्यामध्ये थंडीने नागरिकांना गारठून टाकले. पण रविवारपासून थंडीमध्ये घसरण झाली असून, आता यापुढे तापमानात वाढ होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरातील 'फेंजल' चक्रीवादळ शनिवारी उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पोंडिचेरीजवळ आदळले. 'फेंजल' चक्रीवादळ, आदळताच ते कमकुवत होत त्याचे आज हवेच्या अतितीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर झाले. त्यामुळे महाराष्ट्रात दि. २ ते ४ डिसेंबर असे तीन दिवस केवळ ढगाळ वातावरण राहून, झालाच तर अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. विशेषतः हा परिणाम, सोमवारी (दि.२) दक्षिण महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या महाराष्ट्राच्या अकरा जिल्ह्यांत अधिक जाणवेल, तर मंगळवार-बुधवारी (दि.३ व दि. ४) नांदेड, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या चार जिल्ह्यांत अधिक जाणवेल. येथे पावसाचा अंदाज आहे.
राज्यात रविवारी (दि.१) सर्वांत कमी किमान तापमान नाशिक येथे ११.५ नोंदवले गेले. त्यानंतर जळगाव येथेही ११.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
थंडी कशी राहील?
उत्तर भारतातून संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात थंडी घेऊन येणारे थंड व कोरड्या उत्तरी वाऱ्यांना नागरिकांना हुडहुडी भरायला लावली. कार्तिक अमावास्या ते चंपाषष्टी (दि. १ ते दि.७) पर्यंतच्या आठवड्यात पहाटेच्या किमान व दुपारच्या कमाल अशा दोन्हीही तापमानात किंचितशी वाढ होऊन संपूर्ण महाराष्ट्रात आठवडाभर काहींशी थंडी कमी होताना जाणवणार आहे.
पुढील आठवड्यातील थंडी
आठवड्याभराच्या कालावधीनंतर, म्हणजे रविवार, दि. ८ डिसेंबरनंतर थंडीत पुन्हा वाढ होऊ शकते. परंतु सध्या विषववृत्तीय आग्नेय बंगालच्या उपसागरात जाणवणारी चक्रिय वाऱ्याची स्थिती आणि त्याचबरोबर फेंजल वादळाचे अरबी समुद्रात प्रवेश, त्यानंतर घेणारी दिशा, यावरच महाराष्ट्रातील पुढील आठवड्यातील थंडीची स्थिती अवलंबून असेल, असे माणिकराव खुळे यांनी सांगितले.
राज्यातील किमान तापमान
पुणे : १३.४
अहिल्यानगर : १४.७
जळगाव : ११.८
नाशिक ११.५
सांगली : १८.१
सोलापूर : २०.६
मुंबई : २१.५
परभणी : १७.०
चंद्रपूर : १३.५
नागपूर : १८.५