कर्नाटकी गायकीतून भक्तीचा मळा
By admin | Published: June 10, 2017 02:13 AM2017-06-10T02:13:48+5:302017-06-10T02:13:48+5:30
शास्त्रीय गायकीची बैठक, सुरेल गळा आणि त्याला तितकाच साजेसा ठेका यातून पुण्यातील गल्ल्यांतून कर्नाटकी गायकी भक्तीचा मळा फुलवित आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शास्त्रीय गायकीची बैठक, सुरेल गळा आणि त्याला तितकाच साजेसा ठेका यातून पुण्यातील गल्ल्यांतून कर्नाटकी गायकी भक्तीचा मळा फुलवित आहे. तयारीच्या गायकालाही अचंबित करेल अशी कला असूनही पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना दारोदार फिरावे लागत आहे. मात्र, घराण्याची परंपरा असल्याने कोणाकडे काही मागायचे नाही, देवाची भजने गाऊन लोकांनी झोळीत काही टाकले तरच घेऊन पुढे निघायचे असा त्यांचा शिरस्ता आहे.
लोककलाकारांच्या अंगभूत कलेचा जिवंत नमुना म्हणजे परशुराम महंत आणि त्यांचा सहकारी महेश कल्लाप्पा महंत. हे दोघे कोणी मोठे गायक वा तबलजी नाहीत. पुण्यातील कात्रजच्या एका वस्तीमध्ये राहणारे लोककलावंत आहेत. हे दोघेही मूळचे कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील देवीहाळ तालुक्यामधील रहिवासी आहेत. शिरहाटी नावाच्या एका छोट्याशा खेड्यामधून ते पत्नी व भावासह पंधरा वर्षांपूर्वी पुण्यामध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी आले. कर्नाटकातील प्रसिद्ध संत पुरंदर यांचे ते अनुयायी आहेत. त्यांच्या कुटुंबाचा भजन गाणे हा पारंपरिक व्यवसाय आहे. परशुराम यांच्या मागील कित्येक पिढ्या भजन गातच लहानाच्या मोठ्या झाल्या. कुटुंबाच्या परंपरेने कला दिली, मात्र सुबत्ता दिली नाही. त्यामुळे पोटासाठी पुण्याचा रस्ता धरलेल्या या दोघांनी कला लोकांना दाखवून उपजीविका करण्याचा निर्णय घेतला.