मोरगावच्या मयुरेश्वराचे मंदिर संकष्टीला राहणार बंद: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 03:53 PM2021-03-30T15:53:19+5:302021-03-30T15:53:43+5:30
बारामतीसह पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव..
बारामती : कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे उद्या बुधवारी ( दि. ३१) रोजी संकष्टी चतुर्थी दिवशी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता अष्टविनायक प्रथम तीर्थक्षेत्र मयुरेश्वर मंदिर बंद ठेवले जाणार आहे. याबाबतचा आदेश बारामती प्रांताधिकारी यांकडून प्राप्त झाला असल्याची माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विनोद पवार यांनी दिली.
बारामती तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढती रुग्ण संख्या व उद्या बुधवार दिनांक 31 रोजी संकष्टी चतुर्थी दिवशी होणारी संभाव्य गर्दी याचा विचार करता प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या अनुषंगाने प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी मयुरेश्वर मंदिर बंद बाबतचा आदेश काढला आहे.
आज दि.३०) रोजी हा आदेश चिंचवड देवस्थान ट्रस्ट प्राप्त झाला असून या आदेशाचे पालन करून मयुरेश्वर मंदिर सर्व भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे याची भाविकांनी नोंद घेण्याचे आवाहन विश्वस्त पवार यांनी केले आहे .
उद्या मंदिर परिसरात गर्दी करु नये व प्रशासन , चिंचवड देवस्थान ट्रस्ट्ला सहकार्य करावे. या बंद काळात श्रींच्या परंपरेने चालत आलेल्या पूजा-अर्चा , नैवद्य व इतर धार्मिक विधी हे संपन्न होणार आहे. तर गुरुवार दिनांक १ एप्रिल रोजी सर्व भाविकांना पहाटे साडेपाच वाजल्यापासून नेहमीप्रमाणे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे .