'माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय...', दीड वर्षांनी पुन्हा घुमला जयघोष; आजपासून माऊलींचे मंदीर भाविकांसाठी खुले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 10:49 AM2021-10-07T10:49:19+5:302021-10-07T10:49:42+5:30
आळंदी : "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय" असा जयघोष करत माऊलींच्या संजीवन ...
आळंदी: "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय" असा जयघोष करत माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात भाविकांनी प्रवेश केला. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेले संत ज्ञानेश्वर महाराजांचे संजीवन समाधी मंदिर आज (दि.७) पहाटे चारपासून भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. दरम्यान पहाटेपासूनच माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी आजोळ घरातील दर्शनबारीबाहेर गर्दी केली.
तत्पूर्वी, गुरुवारी पहाटे अकरा ब्रह्मवृंदांच्या हस्ते माऊलींच्या संजीवन समाधीवर घंटानाद, काकडा, पवमान अभिषेक व दुधारती, महापूजा करून पुष्पवृष्टी करण्यात आली. शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून आजोळ घरातील दर्शन रांगेतून भाविकांना मंदिर परिसरात घेण्यात आले. मंदिर प्रवेशावेळी तोंडाला मास्क बंधनकारक करण्यात आला असून हार, फुले, प्रसाद अर्पण करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान भाविकांना सॅनिटाईज करून मंदिरात प्रवेश दिला जात आहे. मंदिर दर तीन तासांनी बंद करून स्वच्छता करण्यात येत आहे. मंदिर परिसरात औषध फवारणी तसेच दर्शनबारीत भाविकांसाठी ठिकठिकाणी सॅनीटायझरची सोय केली आहे. दर्शनबारीतून माऊलींच्या मुख दर्शनानंतर पानदरवाज्यातून भाविकांना मंदिराबाहेर जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शासनाने निर्गमित केलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करून भाविकांनी शांततेत 'श्री'चे मुखदर्शन घ्यावे असे आवाहन देवस्थान समितीकडून करण्यात येत आहे.
घटस्थापनेच्या मुहूर्तावर माऊलींचे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. या निर्णयाचे आळंदी शहर शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, स्थानिक नागरिक, भाविकांकडून पेढे वाटून स्वागत केले. सेनेच्या वतीने मंदिर प्रवेशापूर्वी भक्तांना मास्क वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, अभय टिळक आदिंसह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.