टेंपल रोझच्या संचालक मायलेकींना हैदराबादहून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 06:54 PM2018-09-30T18:54:41+5:302018-09-30T18:56:06+5:30
गेले वर्षभर पसार असलेल्या टेम्पल रोझ कंपनीच्या संचालक मायलेकींना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून हैद्राबाद येथे अटक करण्यात आली.
पुणे : भूखंडात गुंतवणूक करण्याच्या आमिषाने पुणे, मुंबईसह राज्यातील वेगवेगळ्या भागातील ७ हजार गुंतवणुकदारांची ४०० कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गेले वर्षभर पसार असलेल्या टेम्पल रोझ कंपनीच्या संचालक मायलेकींना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून हैद्राबाद येथे अटक करण्यात आली.
वनिता देवीदास सजनानी (वय ५८) आणि दीपा देवीदास सजनानी (वय ३४, दोघी रा. मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या मायलेकींची नावे आहेत. भूखंडात गुंतवणुकीच्या आमिषाने मुख्य संचालक देवीदास सजनानी आणि त्याच्या साथीदारांनी राज्यातील सात हजार गुंतवणूकदारांना गंडा घातला होता. याप्रकरणी टेम्पल रोझचा मुख्य संचालक देवीदास सजनानी (वय ६७) याच्यासह ६ जणांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. त्यापैकी दोन आरोपींना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. टेम्पल रोझचे मुख्य कार्यालय मुंबईत आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात असलेल्या पिंगोरी गावात भूखंडात गुंतवणुकीचे आमिष या कंपनीकडून दाखविण्यात आले होते. गुंतवणुकीवर चांगला परतावा देऊ, असे सांगण्यात आले होते. पुणे, मुंबईसह राज्यातील ७ हजार गुंतवणुकदारांनी ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी आल्या होत्या. मुंबईतही सजनानी आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण अधिनियमाअंतर्गत (एमपीडीए) दोषारोपपत्र दाखल केले होते. प्रशासनाने टेम्पल रोझच्या स्थावर मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरू केली होती. याप्रकरणात मालमत्ता जप्त करण्यात आली होती. न्यायालयाला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जप्त मालमत्तेची माहिती देण्यात आली आहे. या खटल्याची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. टेम्पल रोझच्या संचालक वनिता आणि दीपा या गेल्या वर्षभरापासून फरार होत्या. त्यांचा पुणे आणि मुंबई पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. दोघी हैद्राबाद येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दोघींना ताब्यात घेतले.
श्रीलंकेतून बॅंकाॅंकला पसार हाेण्याचा हाेता त्यांचा विचार
वनिता सजनानी आणि तिची मुलगी दीपा पसार झाल्यानंतर म्हैसुर, गोवा, बंगळुरू, हैद्राबाद येथे नाव बदलून वास्तव्य करत होत्या. तपासधिकारी पोलीस निरीक्षक रौफ शेख यांना दोघी हैद्राबाद येथे असल्याची माहिती मिळाली. पोलीस आयुक्त के. वेंकटेशम, आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंह यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक गणेश विसर्जनचा बंदोबस्त असताना गेल्या रविवारी हैद्राबादला रवाना झाले. दोघींना ताब्यात घेतले. दोघींना पुणे पोलिसांकडे दाखल असलेल्या गुन्हयात जामीन मंजूर करण्यात आला आहे. सजनानी मायलेकींना तपासासाठी मुंबईत दाखल असलेल्या गुन्हयात ताब्यात देण्यात आले आहे. दोघी श्रीलंकेतून बँकाँकला पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती चौकशीत उघड झाली आहे. दोघींनी बनावट नावाची ओळखपत्र तयार केल्याचे उघड झाले आहे.