वीरच्या मंदिरातही महिलांना वर्षभर प्रवेश
By admin | Published: April 11, 2016 12:43 AM2016-04-11T00:43:41+5:302016-04-11T00:43:41+5:30
शनिशिंगणापूर देवस्थानने महिलांना गाभाऱ्यात जाऊन अभिषेक करण्यास परवानगी दिल्यानंतर पुरंदर तााुक्यातील वीर येथील माता जोगेश्वरी व श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरांतील गाभाऱ्यातही महिलांना वर्षभर प्रवेश मिळणार
परिंचे : शनिशिंगणापूर देवस्थानने महिलांना गाभाऱ्यात जाऊन अभिषेक करण्यास परवानगी दिल्यानंतर पुरंदर तााुक्यातील वीर येथील माता जोगेश्वरी व श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरांतील गाभाऱ्यातही महिलांना वर्षभर प्रवेश मिळणार आहे. यापूर्वी फक्त यात्रा व नवरात्रोत्सवातच महिलांना प्रवेश मिळत असे.
गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या ग्रामसभेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांनी समानतेची गुढी उभारली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी दरवर्षी येथील चावडीवर थिटेबंधू पंचांगवाचन करतात. तसेच गावाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. देवस्थान ट्रस्टच्या वतीने यात्रेदरम्यानचा व संपूर्ण वर्षभराचा जमाखर्चाचा अहवाल या वेळी वाचून दाखवला जातो.
देवस्थान ट्रस्टने यात्रेपूर्वीच मंदिरामध्ये महिलांना प्रवेश देण्याचा ठराव देवाचे मानकरी राऊत, शिंगाडे, बुरूंगले, तरडे, व्हटकर, ढवाण, जमदाडे यांच्या संमतीने केला होता. गुढीपाडव्याच्या ग्रामसभेमध्ये महिलांना वर्षभर मंदिर प्रवेशाचा ठराव देवस्थानचे माजी अध्यक्ष रामभाऊ धुमाळ यांनी मांडला. ठरावाला सर्व ग्रामस्थ, देवस्थान, विश्वस्त, मानकरी या सर्वांची मान्यता घेण्यात आली, असे देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब धुमाळ यांनी सांगितले.
यापूर्वी यात्रा व नवरात्रीच्या काळामध्ये महिला श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरीच दर्शन गाभाऱ्यात जाऊन घेत असत. यात्रेतही, देवांच्या लग्नात हळद लावण्याचा मान महिलांना होता. आता वर्षभर गाभाऱ्यात प्रवेश मिळणार आहे.
या वेळी देवस्थानचे सचिव तय्यद मुलाणी यांचा कौमी एकता पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक विलास धुमाळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ग्रामसभेला देवाचे मानकरी तात्या बुरुंगले, पंचायत समिती सदस्य दिलीप धुमाळ, उपसरपंच प्रताप धुमाळ, उपाध्यक्ष संभाजी धुमाळ, विश्वस्त बबन धसाडे, ज्ञानेश्वर धुमाळ, नामदेव जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)