मंदिरांना मिळणार आता नवी ओळख
By admin | Published: November 21, 2014 03:56 AM2014-11-21T03:56:45+5:302014-11-21T03:56:45+5:30
खुन्या मुरलीधर, भिकारदास मारुती, उंबऱ्या गणपती, उपाशी विठोबा, पानमोड्या म्हसोबा, डुल्या मारुती, चिमण्या गणपती, काळा दत्त, पोटशूळ्या मारुती,
दीपक जाधव, पुणे
खुन्या मुरलीधर, भिकारदास मारुती, उंबऱ्या गणपती, उपाशी विठोबा, पानमोड्या म्हसोबा, डुल्या मारुती, चिमण्या गणपती, काळा दत्त, पोटशूळ्या मारुती, उंटाड्या मारुती, पत्र्या मारुती, बंदिवान मारुती, गुंडाचा गणपती..! ही मंदिरांची नावे ऐकून नव्याने पुण्यात आलेल्या व्यक्तीला आश्चर्याचा धक्का बसतो. राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातील मंदिरांची ही नावे बदलण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाने पुढाकार घेतला असून, त्या दिशेने पावले टाकली जात आहेत.
धार्मिक व सार्वजनिक संस्थांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाची आहे. पुणे विभागाचे धर्मादायक सहआयुक्त शिवकुमार डिगे यांच्यासमोर मंदिरांच्या विचित्र नावांचा विषय वकिलांनी नुकताच मांडला. यावर अशा मंदिरांच्या नावाची यादी तयार करण्याच्या सूचना डिगे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार संबंधित मंदिराच्या विश्वस्तांची बैठक घेऊन ही नावे बदलण्याविषयी चर्चा करण्यात येईल. पुणेकरांचा तिरकस स्वभाव व येथील पाट्या देशभर प्रसिद्ध आहेत. या तिरकसपणापासून देवदेवताही वाचू शकलेल्या नाहीत. अनेक मंदिरांना वेगवेगळ्या कारणांमुळे चित्रविचित्र नावे मिळालेली आहेत.
पुण्यातील असंख्य मंदिरांची ही नावे तेथील पत्ते ओळखण्यासाठी लँडमार्क म्हणून वापरली जातात. त्यामुळे त्या-त्या भागात ती चांगलीच प्रसिद्ध आहेत. भिकारदास सावकारांच्या नावावरून भिकारदास मारुती हे नाव पडले. उपवास करणारे भाविक दर्शनाला जात असल्याने उपाशी विठोबा हे नाव मिळाले. भांग पिणाऱ्यांचे आश्रयस्थान असलेल्या मंदिराचे नाव भांग्या मारुती असे झाले.
पानिपतच्या युद्धात मराठ्यांच्या पराभवाच्या बातम्या पोहोचल्यानंतर गणेश पेठेतील मारुतीची मूर्ती हलू लागल्यामुळे या मारुतीला डुल्या मारुती असे नाव पडल्याचे सांगितले जाते. शनिवारवाड्याजवळ बटाट्याची बाजारपेठ होती त्यावरून बटाटा मारुती नाव पडले.