मंदिरं खुली झालीचं पाहिजेत; पुण्यात मनसेचं आंदोलन, सरकारला दिला ८ दिवसांचा अल्टिमेटम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 01:20 PM2021-09-02T13:20:07+5:302021-09-02T13:21:36+5:30
आंदोलनात पक्षातील महिलांच्या हस्ते श्री तांबडी जोगेश्वरी मातेची आरतीही करण्यात आली
पुणे : मंदीर खुली झाली पाहिजेत अशी घोषणाबाजी करत पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोर आंदोलन केले. यावेळी पक्षातील महिलांच्या हस्ते मातेची आरतीही करण्यात आली. पुढील आठ दिवसात मंदिरं उघडली नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही. व स्वतः जाऊन मंदिरं उघडणार असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिलाय.
''गेल्या दीड वर्षापासून मंदिर बंद आहेत. सद्यस्थितीत सर्व व्यवहार, दुकानांना उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण मंदिरांचा विचारही नाही. राजकीय नेत्यांना सभा, यात्रा या गोष्टीला परवानगी मिळते. तेव्हा कोरोनाचा वाढत नाही. त्यांच्यासमोर लपून बसतो. मंदिरं उघडल्यावरच कोरोना वाढतो का? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.''
''पुण्याचं जवळपास ७० टक्के लसीकरण झालाय. अनेकांचे दोन डोसही झाले आहेत. मॉल, हॉटेल आणि दुकानांना नियमांत राहून उघडण्यास परवानगी देण्यात आली. त्याचप्रमाणं मंदिरातही नियम व अटी लागू करूनच खुली करण्यास महाविकास आघाडी सरकारने परवानगी द्यावी. असंही त्यांनी यावेळी सांगितलंय.''
आंदोलनकर्त्यानाच कोरोनाचा विसर
राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मंदिरं उघडण्यासाठी शहरातील मंदिरासमोर आंदोलन करत आहेत. कालही भाजपने कसबा गणपती समोर आंदोलन केलं होत. आज मनसेनं जोगेश्वरीसमोर आंदोलन केलंय. पण दोन्ही वेळेस या कार्यकर्त्याना कोरोनाचा विसर पडल्याचं चित्र दिसून येत आहे. आंदोलनात मोठ्या प्रमाणावर गर्दी करण्याबरोबरच कार्यकर्ते विनामास्क आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसून आलंय. यावेळी आंदोलनात वसंत मोरे, रुपाली पाटील, गणेश भोकरे, आशिष साबळे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.