राज्यातील मंदिरे देवदर्शनास खुली करावीत; अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:13 AM2021-08-22T04:13:10+5:302021-08-22T04:13:10+5:30
राज्यात गेल्या दीड वर्षापासून शासनाने मंदिरे, तसेच धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहेत. यामुळे देवदर्शन, इतर धार्मिक कार्यक्रम आणि धार्मिक ...
राज्यात गेल्या दीड वर्षापासून शासनाने मंदिरे, तसेच धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहेत. यामुळे देवदर्शन, इतर धार्मिक कार्यक्रम आणि धार्मिक अखंड हरिनाम सप्ताह बंद आहेत. यामुळे होणारे समाज प्रबोधनाचे कार्यक्रम थांबले आहेत. तर मंदिर परिसरातील व्यापारी, हारफुले विक्रेते यांचा रोजगार धोक्यात आला आहे. परिणामी, शासनाने लादलेले निर्बंध तत्काळ शिथिल करून सर्वांना दिलासा द्यावा. अन्यथा, मंदिरे देवदर्शनासह इतर धार्मिक कार्यक्रमांच्या मागणीस राज्यात तीव्र आंदोलन भाविकांच्या वतीने छेडण्यात येईल असा खणखणीत इशारा ॲड. तापकीर यांनी दिला आहे.
यासंदर्भात मंदिरावरील निर्बंध शिथिल करण्याची मागणी ॲड. तापकीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवेदनाद्वारे केली आहे.
शासनाने राज्यात इतर उद्योग, इतर व्यवसाय, मद्याची दुकाने, पर्यटन, हॉटेल व्यवसाय, लग्नसमारंभ मर्यादित संख्येने सुरू ठेवली आहेत. अशाच प्रकारे आता शासनाने मंदिरांवरील असलेली बंधने शिथिल करून नियम, अटी, शर्ती, सूचना करून मंदिरांत देवदर्शन तसेच धार्मिक स्थळांसह राज्यात धार्मिक कार्यक्रम यांना परवानगी देऊन भाविक, वारकरी यांचा दर्शनाचा हक्क हिरावून न घेता परत द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.