पुणे-नाशिक महामार्गावर टेम्पोला लागलेल्या आगीत टेम्पो आणि पुठ्ठे जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 01:23 PM2022-04-27T13:23:57+5:302022-04-27T13:36:53+5:30
आळेखिंडी परिसरात मंगळवार मध्यरात्रीची घटना
आळेफाटा (पुणे) : पुठ्ठे घेऊन जाणाऱ्या मालवाहू टेम्पोला अचानकपणे आग लागली. या दुर्घटनेत टेम्पो व पुठ्ठे जळून खाक झाले. पुणे- नाशिक महामार्गावर आळेखिंडी परिसरात मंगळवार (दि 26) मध्यरात्री ही घटना घडली.
याबाबत माहिती अशी की, पुणे बाजूने नाशिककडे पुठ्ठे घेऊन जाणारा मालवाहू टेम्पोला (क्र. एम. एच. 04 ई. एल. 7734) पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाट्यापासून पाच किलोमीटर असलेल्या जिल्हाचे सरहद्दीवरील आळेखिंडी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अचानकपणे आग लागली. टेम्पोत पुठ्ठे असल्याने पाहता पाहता ही आग पसरत गेली व यामुळे हा टेम्पो जळून खाक झाला. टेम्पोला आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आले वाहन थांबवून आग विझविण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी योग्य सूचना दिल्या व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आग इतकी भयंकर होती की काही वेळातच संपूर्ण टेम्पो जळून खाक झाला.
नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची काही वेळ कोंडी झाल्याने पोलिसांनी या चौपदरीकरण रस्तावरील वाहतूक एकेरी वळवली आहे. आग कशामुळे लागली व किती नुकसान झाले याची माहिती समजू शकली नाही. पुणे नाशिक महामार्गावर वाहनांना आगी लागण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढले आहेत.