लॉकडाऊनमध्ये भाजीपाला विकून दारी आला टेम्पो!; पुण्यातील जितू जाधव या युवकाची जिद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 02:14 AM2020-07-12T02:14:49+5:302020-07-12T06:41:25+5:30
जनवाडी भागात राहणारे जितू हे पूर्वी शनिपाराजवळ भाजी विक्री करीत असत. तेथील इमारत पाडल्याने त्यांची भाजीविक्रीची जागा गेली. त्यानंतर त्यांनी जनवाडीतील घराबाहेरच भाजी विक्री सुरू केली.
पुणे : लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे व्यवसाय बंद पडले. अनेकांना बेरोजगारीला सामोरे जावे लागले. पण, या लॉकडाऊनचा काही जणांनी संधी समजून फायदा घेत व्यवसाय वाढविला आणि आता त्यांच्या घराच्या दारात नवा कोरा टेम्पो आला. जितू जाधव यांनी भाजीपाला विकून नवीन टेम्पो घेतला आहे.
जनवाडी भागात राहणारे जितू हे पूर्वी शनिपाराजवळ भाजी विक्री करीत असत. तेथील इमारत पाडल्याने त्यांची भाजीविक्रीची जागा गेली. त्यानंतर त्यांनी जनवाडीतील घराबाहेरच भाजी विक्री सुरू केली. त्यातून त्यांचे घर चालत होते. लॉकडाऊन सुरू झाल्यावर भाजी घेण्यासाठी लोकांची जनवाडीत गर्दी होत असल्याने पोलिसांकडून वारंवार भाजीविक्री बंद केली जात होती. तेव्हा जितू यांनी जुन्या टेम्पोतून हडपसर, शेवाळवाडी येथून भाजीपाला, फळे घेऊन लोकांच्या दारात जाऊन विक्री करण्यास सुरुवात केली. घरासमोर आणि तीही ताजी भाजी मिळू लागल्याने लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, त्यातून त्यांचा उत्साह वाढत गेला.
याबाबत जितू जाधव यांनी सांगितले की, पहाटे ३ वाजता जाऊन शेवाळवाडी, हडपसर येथून १० ते १५ हजार रुपयांचा भाजीपाला, फळे घेऊन येतोÞ गोखलेनगरमधील दोन, तीन ठिकाणी हा भाजीपाला विकतो. येथील इमारतीतील लोकांनाही चांगली भाजी मिळत असल्याने टेम्पो आल्याशिवाय ते खाली उतरत नाही. केवळ तीन ठिकाणीच दुपारी २ पर्यंत सर्व भाजीची विक्री होते. माझ्याकडे जुना टेम्पो होता, तो बंद पडला. दररोज भाड्याचा टेम्पो घेणे परवडत नव्हते. त्यामुळे नवा टेम्पो घेण्याचा निर्णय घेतला आणि काही दिवसांतच
तो विकत घेतलाही!