डिझेल टाकी फुटून लागलेल्या आगीत टेम्पो जळून खाक; दोघे जखमी, जुन्नरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 04:21 PM2023-04-23T16:21:29+5:302023-04-23T16:21:42+5:30

आगीचा भडका उडाल्यानंतर त्याचवेळी टेम्पोच्या काचा फोडून चालक व एकाला ग्रामस्थांनी तातडीने बाहेर काढले

Tempo gutted in diesel tank fire; Two injured, incident in Junnar | डिझेल टाकी फुटून लागलेल्या आगीत टेम्पो जळून खाक; दोघे जखमी, जुन्नरमधील घटना

डिझेल टाकी फुटून लागलेल्या आगीत टेम्पो जळून खाक; दोघे जखमी, जुन्नरमधील घटना

googlenewsNext

आळेफाटा : मालवाहू टेम्पो व मालवाहू पिकअप यांच्यात झालेल्या भीषण अपघातात टेम्पोची डिझेल टाकी फुटून लागलेल्या आगीत टेम्पो जळून खाक झाल्याची घटना पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाटा परिसरात रविवार (दि. २३) रोजी पहाटेपूर्वी तीन वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत.

याबाबत माहिती असे की पुणे येथून वाहनांचे रेडिएटर स्पेअर पार्ट घेऊन जाणारा टेम्पो (क्रमांक एम पी ०९ जी एफ ८४४६) हा पुणे-नाशिक महामार्गाने मध्य प्रदेशकडे जात होता. आळेफाटा पासून अवघ्या काही अंतरावरील हॉटेल कलासागर समोर समोरून गुजरातहून येत असलेली मालवाहू पिकअप टेम्पोवर येऊन आदळला. अपघात इतका भीषण होता की, वाहने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जाऊन पलटी झाली. या अपघातात टेम्पोची डिझेल टाकी फुटल्याने आगीचा भडका उडाला. त्याच वेळी टेम्पोच्या काचा फोडून चालक व इतर एकजण यांना बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. पाहता पाहता आगीची तीव्रता वाढली. यामुळे हा टेम्पो जळून खाक झाला. सदर अपघाताची माहिती मिळताच आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर, पोलिस कर्मचारी पी. डी. गर्जे, चंद्रशेखर डुंबरे, एस. ए. दुपारगुडे, पी. एम. आव्हाड, एच. आर. ढोबळे घटनास्थळी आले. तेथील किराणा दुकानदार संदीप शिरतर व ग्रामस्थ यांनीही आग विझवण्याचा प्रयत्न केला. जुन्नर येथून अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. काही वेळातच ही गाडी तेथे आली व त्यानंतर आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत मालवाहू आयशर टेम्पो व त्यातील रेडिएटर स्पेअर पार्ट्स जळून खाक झाले होते.

या अपघातात पिकअपमधील संजय नवसू आसरीया (वय २३) व जितेंद्र सिंग पुरोहित (वय २१ दोघे रा कपराडा बलसाड गुजरात) हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी पोलिस व ग्रामस्थ यांनी आळेफाटा येथील दवाखान्यात दाखल केले. या अपघातात पिकअपचेही मोठे नुकसान झाले. अपघाताची प्राथमिक माहिती आळेफाटा पोलिस ठाण्यात देण्यात आली असून, अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Tempo gutted in diesel tank fire; Two injured, incident in Junnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.