टेम्पाेची दुचाकीला धडक ; तरुणीचा जागेवरच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 15:23 IST2019-11-25T15:18:36+5:302019-11-25T15:23:09+5:30
गाडी घसरुन रस्त्यावर पडलेल्या तरुणीच्या डाेक्यावरुन टेम्पाेचे चाक गेल्याने तरुणीचा जागेवरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कात्रज प्राणी संग्रहालयाजवळ घडली आहे.

टेम्पाेची दुचाकीला धडक ; तरुणीचा जागेवरच मृत्यू
धनकवडी : सातारा रस्त्यावरील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय चौकात दुचाकीला टेंपो धडकून झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुणीचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी बारा वाजता घडली. एकता प्रभाकर कोठावदे वय २६, ( राहणार मुळ गाव चांदसर , तालुका धरणगाव जिल्हा जळगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त दुचाकी बाजूला घेतली. ऐन वरदळीची वेळ आणि बघ्यांची गर्दी यामुळे काहीकाळ वाहतूक मंदावली होती. मात्र पोलिसांनी वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणी एका नामांकित महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत होती. दुपारी बारा वाजता ती स्वारगेट कडून कात्रजकडे जात असताना राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या वाहनतळासमोर तरुणीची गाडी घसरली त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या माल वाहतूक टेम्पाेच्या चाकाखाली आल्याने तरुणीचा जागेवरच मृत्यू झाला. टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.