चालकाला डुलकी लागल्याने टेम्पोची कंटेनरला धडक; मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 19:23 IST2020-03-06T19:00:51+5:302020-03-06T19:23:23+5:30
पुण्याच्या दिशेने दुधाचे कॅन घेऊन येत होता टेम्पो

चालकाला डुलकी लागल्याने टेम्पोची कंटेनरला धडक; मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर अपघात
शिरगाव : मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर दुधाचे कॅन घेऊन जाणाऱ्या टेम्पोने कंटेनरला पाठीमागून धडक दिली. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. टेम्पोचालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. ओझर्डे गावाच्या हद्दीत द्रुतगतीमार्गावर शुक्रवारी (दि. ६) रोजी सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला.
बळवंत कुमार (वय २७), संजय मीर (वय २०, दोघे रा. प्राधिकरण) अशी अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या दिशेने दुधाचे कॅन घेऊन जाणाऱ्या टेम्पोच्या चालकाला डुलकी लागल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टेम्पोची समोरील कंटेनरला जोरदार धडक बसून हा भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पोचालकासह टेम्पोमधील एक जण असे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सोमाटणे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. महामार्ग पोलिसांनी तत्काळ अपघातग्रस्त वाहने बाजूला काढल्याने वाहतूक सुरळीत सुरु झाली.