दप्तराच्या ओझ्यावर तात्पुरती मलमपट्टी

By Admin | Published: July 7, 2017 03:12 AM2017-07-07T03:12:16+5:302017-07-07T03:12:16+5:30

शाळेतील विद्यार्थ्यांच्या वजनाच्या निम्मे दप्तराचे वजन त्यांना दररोज उचलावे लागत असल्याच्या प्रश्नावर शासन, शाळा व पालकांच्या

Temporary bandage | दप्तराच्या ओझ्यावर तात्पुरती मलमपट्टी

दप्तराच्या ओझ्यावर तात्पुरती मलमपट्टी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शाळेतील विद्यार्थ्यांच्या वजनाच्या निम्मे दप्तराचे वजन त्यांना दररोज उचलावे लागत असल्याच्या प्रश्नावर शासन, शाळा व पालकांच्या स्तरावर अनेकदा प्रयत्न करूनही दप्तराच्या ओझ्याचा प्रश्न अजूनही जैसे थे असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये दिसून आले. पुणे जिल्ह्यासह शहरातील विविध शहरांची यानिमित्ताने पाहणी करण्यात आली.
शासनाचा आदेश निघाला, तपासणी सुरू झाली किंवा प्रसारमाध्यमांमधून चर्चा सुरू झाली की तेवढ्यापुरते दप्तराचे ओझे काहीसे हलके होते, मात्र त्यानंतर पुन्हा ‘जैसे थे’च परिस्थिती राहत असल्याचे दिसून आले. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी ई-लर्निंगवर भर देणे, वह्या-पुस्तकांचे आकार कमी करणे आदी कायमस्वरूपी पर्यायांवर भर देणे आवश्यक असल्याची भावना शिक्षक व मुख्याध्यापकांनी व्यक्त केली.
शैक्षणिक वर्षाला सुरूवात झाल्यानंतर शिक्षण विभागाने शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना विद्यार्थ्यांच्या दप्तरांची तपासणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. प्रत्यक्षात बहुतांश ठिकाणी मात्र या आदेशाची अंमलबजावणी झालीच नाही. यापार्श्वभूमीवर ‘लोकमत टीम’ने विद्यार्थी, पालक, शिक्षक व मुख्यापकांशी संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली.
काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांना वेळोवेळी आवश्यक तितक्याच वह्या, पुस्तके घेऊन येण्याच्या सूचना त्यांच्याकडून दिल्या जातात. त्याचबरोबर अधूनमधून त्यांची दप्तरेही शिक्षकांकडून तपासली जातात. एका शाळेने शनिवारी ‘नो बॅग डे’ ही संकल्पनाही राबविली आहे. शाळेत फर्निचर व कपाटाच्या सुविधा असलेल्यांनी दप्तरे शाळेतच ठेवण्याचेही प्रयोग राबवून हा प्रश्न त्यांच्यापुरता सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या शाळांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे.
बहुतांश शाळांमध्ये मात्र दैनंदिन धावपळीमध्ये विद्यार्थ्यांच्या दप्तर ओझ्याचा प्रश्न हरवून गेला असल्याचे दिसून आले. अभ्यासक्रमातील अनेक संकल्पना विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगायच्या तर शिकविताना त्यांच्याजवळ पुस्तक असावेच लागेल. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसायला बाक, चांगले फळे अशा मूलभूत सुविधांचीच वानवा असताना सर्व विद्यार्थ्यांची दप्तरे किंवा वह्या-पुस्तके ठेवण्यासाठी कपाटे तिथे उपलब्ध होणे शक्यच नाही. शाळाबाह्य कामांचा भार वाहताना दप्तराच्या ओझ्याकडेही आम्हीच लक्ष द्यायचे का असा प्रश्नही काही शिक्षकांनी विचारला. त्यामुळे अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पाठीवर लटकलेली मोठी दप्तरे यामध्ये फारसा बदल झालेला नसल्याचे दिसून आले.

शासनाकडून धोरणाला हरताळ
राज्य शासनाने विद्यार्थी दप्तराच्या ओझ्याखाली दबले जाऊ नयेत, यासाठी धोरण निश्चित करून त्याबाबतचे आदेश शाळांना दिले आहेत. मात्र यंदा ७ वी व ९ वीची पुस्तके बदलण्यात आली. या इयत्तांची बदलेली पुस्तके हे आता मोठ्या आकाराची (फुलस्केप) करण्यात आली आहेत. त्यामुळे साहजिक विद्यार्थ्यांनाही मोठ्या आकाराची दप्तरे घ्यावी लागणार आहेत.
वस्तुत: ही पुस्तके बनविताना एका विषयाच्या दोन सत्रांसाठी भाग १ व भाग २ अशी बनविता येणे सहज शक्य होते. मात्र शासनाच्या पातळीवर निर्णय घेताना दप्तराच्या ओझ्यांबाबत गांभीर्य नसते.
केवळ तपासण्याचे कागदोपत्री आदेश काढून विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कधीच कमी होणार नाही. त्यासाठी शासनाला प्रत्यक्ष कृतीच्या पातळीवर निर्णय
घ्यावे लागतील, अशी तळमळीची भावना एका शाळेतील ग्रंथपालांनी व्यक्त केली.

डोक्यावरचे ओझेही वाढले

लोकमत न्यूज नेटवर्क
राजगुरुनगर : शासनाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी केले खरे. मात्र, शाळेने वेगवेगळ्या परीक्षा आणि अभ्यासक्रमाबाहेरील विषय बंधनकारक करून विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचे ओझे मात्र शाळांनीच वाढवले आहे.
खेड तालुक्यात शिक्षणाच्या वाढलेल्या पसाऱ्याने शाळांची संख्या अफाट वाढली आहे. साहजिकच शाळांमधील स्पर्धाही वाढीस लागली असून आपले वेगळेपण दाखवून देण्यासाठी शाळांनी स्वत:च अभ्यासक्रमाबाहेरील विषयांचे शिक्षण देण्याची सुरुवात करत असल्याचे चित्र आहे. जी मुले दोन दोन किलोमीटर पायपीट करित दप्तराचे ओझे पाठीवर घेऊन जातात. अशा मुलांच्या खांद्यावर ओझे असल्याने सांधे आखडतात, कायम वाकून चालल्याने कंबरदुखी व पाठदुखी होण्याचा धोका असतो.

पाठीवरचे ओझे ‘जैसे थे’च
जुन्नर : राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने मागील दोन वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझे कमी करण्यासंदर्भात सुचविलेल्या उपाययोजना तसेच राबविण्यात येणारे धोरण याबाबत विद्यार्थी
सध्यातरी अनभीज्ञ आहेतच. तर याबाबत एखादा अपवाद वगळता पालक, शिक्षक यांना ही काही गांभीर्य नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

काही खाजगी शाळा केवळ दप्तर तपासणी पुरती मुलांची दप्तरे हलकी करण्याची चलाखी करतात व तपासणी संपली की पुन्हा बोजा पूर्ववत करतात किंबहुना तो दररोजच आहे, तसाच पहायला मिळतो. शेवटी अभ्यासापेक्षा दप्तर जड होते... पर्यायाने शिक्षण प्रक्रियेतही जडत्व येते.
- संजय नाईकरे, पालक, कडधे


प्राथमिक शाळेत वर्गामध्येच लॉकर्स

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर : येथील शाळांमधील विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे अद्याप कमी झाले नसले तरी काही शाळांमध्ये हे ओझे कमी करण्यासाठी पावले उचलली जात असल्याचे चित्र आहे. विद्याधाम प्राथमिक शाळेने प्रत्येक वर्गात प्रत्येकी ६० लॉकर्स उपलब्ध करून विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे हलके केले आहे.
शाळेतील १८ वर्गात प्रत्येकी ६० लॉकर्सची सुविधा उपलब्ध करून दिली. यामुळे विद्यार्थ्यांचे दप्तराचे वजन हलके झाल्याचे मुख्याध्यापिका ज्योती मुळे यांनी सांगितले. विद्याधाम प्रशालेमध्ये ४८ वर्गांत लॉकर्स बनविण्याचे काम सध्या सुरू असून लवकरच ते पूर्णत्वास येईल व दप्तराचे ओझे कमी होईल, असे मुख्याध्यापक डी. एन. खरमाटे यांनी सांगितले.
इतर शाळांनीही या शाळांचे अनुकरण करणे गरजेचे आहे. शिक्षण खरं तर आनंददायी असायला हवे मात्र वाढलेले दप्तराचे ओझे ही विद्यार्थ्यांसाठी क्लेशदायक ठरत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. आता विद्यार्थ्यांच्या पाठीवर असणारे दप्तराचे ओझे पाहता मुलगा घरी येतो तेव्हा त्याचा हिरमुसलेला, थकलेला चेहरा पाहायला मिळतो, अशी भावना असते, असे पालक अमोल रासकर यांनी सांगितले.

दप्तराच्या ओझ्याने पालकांच्या माथी मात्र चिंता

वालचंदनगर : राज्यात विद्यार्थ्यांच्या जीवाचा विचार करून पाठीरील ओझे कमी करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. परंतु, आजही ग्रामीण भागातील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचे ओझे कायम आहे. शालेय पोषण आहार काही विद्यार्थी खात नसल्याने जेवणाचा डबा, पाण्याची बाटली आणतात. पुस्तके बॅगमध्ये घेऊन येतात. अनेक शाळेत विद्यार्थ्यांचे ओझे कमी करण्यासाठी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नाईलाजास्तव आजही विद्यार्थ्यांच्या पाठीवर ओझे दिसून येत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या निर्णायक धोरण ग्रामीण भागात फोल ठरलेले दिसत आहे. शाळेत काय शिकवले, यांची उजळणी करण्यासाठी घरी पुस्तके नसतात. त्यामुळे मुलांना शाळेत दररोज वह्या पुस्तके, डबा, पाणी सोबत दररोज घेऊन जाण्याशिवाय पर्याय नाही. त्याचबरोबर शासनाने शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह जेवण म्हणून शालेय पोषण आहार चालू केलेले आहे. परंतु जेवण चांगल्या दर्जाचे मिळत नसल्याने अनेक विद्यार्थी शाळेतील जेवण करणे पसंत करीत नाहीत.

सांगवी : शाळकरी मुलांच्या पाठीवर दप्तराचे ओझे कायमच पहायला मिळत आहे. अलिकडे शिक्षणाचे महत्त्व वाढू लागले आहे. तस तसे लहान मुलांच्या दप्तरातील अभ्यासाचे साहित्यात ही वाढ होऊ लागली आहे. गृहपाठ, क्रीडा, कला, यामुळे लहान वयात त्यांच्या कलागुणांना वाव मिळतोच. परंतु, आवश्यक तितक्या प्रमाणापेक्षा अभ्यासक्रमामुळे लहान मुलांपासून पालकांपर्यंत हा चिंतेचा विषय बनू लागला आहे. इतक्या लहान वयाच्या मानाने मुलांना दप्तराचा बोझा जास्त आहे. तसेच अभ्यासक्रम ही जास्त वाटत आहे. लहान गटातील मुलांना अभ्यासक्रम कमी देण्यात यावा. पुढील वर्गात जसजसे विद्यार्थी मुले जातील तसतसा हळूहळू अभ्यासक्रमात वाढ करावी. यामुळे पालक वर्गात चिंतेचा विषय राहणार नाही, पालक धनंजय जगताप यांनी सांगितले.


ओझे हलके करण्यासाठी...

लोकमत न्यूज नेटवर्क
जेजुरी : जेजुरीतील प्रथितयश जिजामाता हायस्कूल आणि प्राथमिक शाळेतील मुलांच्या दप्तरांच्या ओझ्याचे योग्य नियोजन होण्यासाठी स्वतंत्र विभागच निर्माण केला आहे. या विभागाकडून दर महिन्याला विद्यार्थ्यांचे वजन आणि दप्तराच्या ओझ्याच्या नोंदी ठेवल्या जात आहे. विद्यार्थ्यांना ओझे वागवावे लागू नये, असा आमचा प्रयत्न आहे. प्रा. नंदकुमार सागर आणि मुख्याध्यापिका गायत्री बल्लाळ यांनी सांगितले.

मुले २ री इयत्तेत शिकतात. शाळेत दररोज दुपारचा भोजनाचा डबा, आणि १ पुस्तक व दोन वह्याच देण्याचा नियम केला आहे. तशा शाळेकडून सूचना आहेत. यामुळे मुलांना दप्तराचे ओझे जाणवत नाही. हे वजन विद्यार्थ्यांसाठी योग्य वाटते.
- वृषाली खळदकर
व रेखा चाचर, पालक

माझा रिक्षाचा व्यवसाय आहे़ काही शाळांतून पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे ८ ते ९ किलो भरते. त्यांना दप्तरासह रिक्षात बसताही येत नाही. मलाच त्याचे दप्तर व्यवस्थित ठेवावे लागते. अनेक शाळा याबाबत अजूनही गांभीर्याने घेत नाहीत.
- विलास नागवडे, रिक्षाचालक

माझी पाल्य जिजामाता इंग्लिश स्कूलमध्ये २ रीत शिकत आहे. विद्यार्थ्याला दररोज होमवर्कसाठी लागणारीच वह्या पुस्तके दप्तरात ठेवतात. साधारणपणे १ पुस्तक व २ वह्या राहतात. बाकी सर्व वह्या-पुस्तके स्कूल मध्येच असतात. यासाठी वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. यामुळे दप्तराचे ओझे राहत नाही. - नुरजहां आतार, पालक

ई-लर्निंगच्या प्रयोगावर भर

तंत्रज्ञान वेगाने बदलत चालले आहे, याचा चांगला उपयोग शाळास्तरावर करून घेता येणे शक्य आहे. आता विद्यार्थ्यांना पुस्तकातील चित्र दाखवून शिकविण्यापेक्षा ई-लर्निंगव्दारे डिजिटल फळ्यावर प्रत्यक्ष घटना या आॅडिओ-व्हिडीओ, सीडी याव्दारे दाखविता येऊ शकतात. त्या त्या विषयातील तज्ज्ञांची व्याख्याने, सुंदर कविताही, माहितीपट इंटरनेटवर मोफत उपलब्ध आहेत. त्यामुळे शाळांमध्ये ई-लर्निंगच्या सुविधा उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांनी पुस्तके घेऊन शाळेत यावे, असे सांगण्याची गरजच उरणार नाही. दप्तराच्या ओझ्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढायचा असेल तर ई-लर्निंगच्या शिक्षणावर जास्तीत जास्त भर द्यावा लागेल.

वह्या ठेवा शाळेतच़़़
तिसरी पर्यंत वेळापत्रक आखून ऐकमेकांना पुरक असे प्रत्येकी २ किंवा ३ विषयच शिकवावे व रोटेशन पध्दतीने पुढील विषयांचे दिवसावर शिकवण्याचे नियोजन करावे सर्वच विषय एकाच दिवशी शिकवून दप्तराचे ओझे वाढतेच. बॅगचे वजन मुलांच्या खांद्यावर टाकण्यापेक्ष्या फक्त गृहपाठाचा वह्याच फक्त घरी आणणे क्लास वर्कच्या वह्या शाळेतच ठेवल्यास मुलांना दप्तराचे ओझे वाटणार नाही.
-जयसिंग मांजरे, पालक, मांजरेवाडी

पालकांनी लक्ष द्यावे
विद्यालयाने दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केवळ १०० पानी वह्याच ठेवलेल्या आहेत. एकूण ६ विषयांसाठी गृहपाठ आणि वर्गपाठ यासाठी प्रत्येकी दोन वह्या करण्यास सांगितल्या आहेत. यातील केवळ वर्गपाठाच्याच वह्या शाळेत आणावयास सांगितलेल्या आहेत. एखाद दुसरी वही गृहपाठ तपासण्यासाठी शाळेत न्यावी लागते. साधारणपणे विद्यार्थ्याच्या दप्तरात वर्गपाठासाठी ६ पुस्तके, ६ वह्या आणि दोन गृहपाठाच्या अशा एकूण ८ वह्या व ६ पुस्तकेच शाळेत न्यावी लागतात.
- सचिन साळुंके, पालक

शाळेत आठवड्यातून एकदा दप्तर तपासणी आम्ही दररोज शाळेच्या तासिकांप्रमाणेच वर्गात दप्तर नेतो. चित्रकला, क्रीडाच्या तासिका असतील तर त्याचे साहित्य वाढते. मात्र आमच्या शाळांमध्ये आठवड्यातून एकदा शिक्षकांकडून दप्तर तपासले जाते.
- आर्या शिंदे,
इयत्ता ३ री, अभिनव स्कूल

दररोज ८ तासिका असतात, त्याप्रमाणे वह्या-पुस्तके व गृहपाठाच्या वह्या शाळेत न्याव्या लागतात. आवश्यक तितकीच वह्या-पुस्तके घेऊन येण्याच्या सूचना शिक्षकांकडून केल्या जातात.
- ऋग्वेद काळे,
इयत्ता ६ वी, रमणबाग शाळा

दप्तराचे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन कमी करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो. शाळेमध्ये दररोज ८ तासिका असतात. मात्र एकाच विषयाच्या दोन तासिका याप्रमाणे दररोज ४ ते ५ विषयांचीच वह्या-पुस्तके विद्यार्थ्यांना आणावी लागतात.
- संतोष खोरे, रामराज्य विद्यालय, बिबवेवाडी

Web Title: Temporary bandage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.