पुण्यामध्ये वसतीगृहात उभारले तात्पुरत्या स्वरुपाचे कारागृह; किमान तीनशे जणांची होणार व्यवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 07:37 PM2020-05-23T19:37:29+5:302020-05-23T19:40:36+5:30
या नव्याने तयार करण्यात आलेल्या तुरुंगाची सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट करण्यात आली आहे
पुणे : कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव लक्षात घेऊन तुरुंगात कोरोनाची लागण होऊ नये यासाठी कच्च्या कैद्यांना जामिनावर सोडण्यात आले आहे. आता नव्याने येणाऱ्या कैद्यांकरिता येरवड्यातील बार्टी कार्यालयाजवळील मागासवर्गीय मुलांमुलांच्या वसतीगृहात तात्पुरत्या कैद्यांना ठेवण्याची व्यवस्था 4 मे पासून करण्यात आली आहे. यात 92 पुरुष कैदी तर 09 महिला कैदी यांचा समावेश आहे. या तुरुंगात किमान तीनशे जणांना ठेवता येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार कैद्यांच्या सुटकेसाठी हाय पावर कमिटी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यात या कमिटीने सात वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावण्यात आलेल्या कैद्यांना सोडण्याचे आदेश तुरुंग प्रशासनाला दिले आहेत. सध्या येरवडा कारागृहातून मोठ्या संख्येने कैदी सोडण्यात आले आहेत. मात्र नव्याने दाखल होणाऱ्या कैद्यांना चार मागासवर्गीय मुलांमुलींच्या वसतीगृहात तयार करण्यात आलेल्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
'लोकमत' ला माहिती देताना येरवडा कारागृहाचे पोलीस अधिक्षक यु टी पवार म्हणाले, येरवडा तुरुंग प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यांच्या परवानगीने सध्या इ कॉमर्स झोन जवळील मागासवर्गीय वसतीगृहात कैद्यांना ठेवण्यात येत आहे. या नव्याने तयार करण्यात आलेल्या तुरुंगाची सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट करण्यात आली आहे. चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महिला कारागृहाच्या बाहेर देखील सुरक्षाव्यवस्था तैनात आहे. तुरुंगासाठी स्वतंत्र व्यवस्था असल्याने याठिकाणी अधिक दक्षता घ्यावी लागत आहे. यासाठी पुणे पोलिसांची देखील मदत घेण्यात आली आहे.
अंतर्गत सुरक्षेसाठी तुरुंग प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी काम करीत आहेत. या कारागृहात 92 कैद्यांना ठेवण्यात आले आहे. आरोग्याच्या दृष्टीने देखील कैद्यांची काळजी घेण्यात आली आहे. तुरुंगात आल्यानंतर त्यांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्यांना तातडीने रुग्णालयात पोहचविण्याची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. अद्याप कुणी आढळलेला नाही. नवीन येणा-या कैद्यांमुळे कारागृहातील कैद्यांना त्रास होऊ नये यासाठी नव्या तात्पुरत्या कारागृहाची निर्मिती करण्यात आली आहे. यापुढे प्रशासनाकडून ज्या सुचना येतील त्यानुसार निर्णय घेण्यात येईल. असे पवार यांनी यावेळी सांगितले.