पुन्हा एकदा पीएमपीच्या अध्यक्षपदाची खुर्ची रिकामीच ; पूर्णवेळ अधिकारी नाहीच 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 11:30 PM2020-03-12T23:30:00+5:302020-03-12T23:30:02+5:30

पीएमपीला ‘आयएएस’ अधिकारी मिळूनही त्यांना कालावधी पूर्ण करता येत नाही.

Temporary shoulder to PMP again; No full time officer | पुन्हा एकदा पीएमपीच्या अध्यक्षपदाची खुर्ची रिकामीच ; पूर्णवेळ अधिकारी नाहीच 

पुन्हा एकदा पीएमपीच्या अध्यक्षपदाची खुर्ची रिकामीच ; पूर्णवेळ अधिकारी नाहीच 

Next
ठळक मुद्दे१२ वर्षांत पीएमपीला मिळाले १५ अधिकारीअध्यक्षपद पुन्हा रिक्त झाले असून नवीन अधिकारी कधी मिळणार, याची प्रतीक्षा

पुणे : कधी काही दिवस, तर कधी काही महिन्यांसाठी अधिकाऱ्यांचा कार्यकाळ अनुभवलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)चा भार पुन्हा तात्पुरत्या खांद्यावर गेला आहे. पीएमपीच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांची ‘यशदा’च्या उपमहासंचालकपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पण, पीएमपीला पूर्णवेळ अधिकारी न देता त्यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पीएमपीच्या अध्यक्षपदाची खुर्ची रिकामीच राहील.
पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष आर. एन. जोशी वगळता एकाही अधिकाऱ्याला पीएमपीमध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. जोशी यांनी तीन वर्षे पूर्णवेळ काम पाहिले. पीएमपीचे महामंडळात रूपांतर झाल्यानंतर केवळ जोशी हे एकमेव अधिकारी दोन वर्षांहून अधिक काळ मिळालेले आहेत. त्यानंतर गुंडे यांनाच दोन वर्षे पूर्ण करता आली. त्यांची जानेवारी महिन्यात आदिवासी कल्याण व संशोधन विभागाच्या आयुक्तपदी बदली झाली होती. तर, रायगडचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे पीएमपीचा पदभार देण्यात आला. पण, सूर्यवंशी यांनी पीएमपीचा पदभार न स्वीकारल्याने दोघांच्याही बदल्या रद्द करून गुंडे यांच्यावर पुन्हा पीएमपीची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर आता त्यांची यशदामध्ये बदली करण्यात आली आहे; पण ही बदली करताना राज्य शासनाला पीएमपीला कोणताही अधिकारी न देता गुंडे यांच्याकडेच तात्पुरता पदभार दिला आहे.
पीएमपीला ‘आयएएस’ अधिकारी मिळूनही त्यांना कालावधी पूर्ण करता येत नाही. काही अधिकाऱ्यांना पीएमपीचे अध्यक्षपद म्हणजे पदावनती वाटे; त्यामुळे त्यांचा रोख लवकरात लवकरत बदली करून घेण्याकडे असे. परिणामी, १२ वर्षांत पीएमपीला १५ अधिकारी मिळाले. त्यांपैकी आठ अधिकाऱ्यांकडे पीएमपीची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेण्यात अनेक अडचणी आल्या. प्रामुख्याने कंपनी स्थापन झाल्यानंतर बसखरेदीची प्रक्रियाच दोन वर्षांपर्यंत झाली नाही. कंपनीचा कणा असलेला आस्थापना आराखडा रखडला. तोट्यात सातत्याने वाढ झाली. त्याकडे राज्यकर्त्यांनीही गांभीर्याने पाहिले नाही. आताही गुंडे यांची बदली करताना नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही; त्यामुळे अध्यक्षपद पुन्हा रिक्त झाले असून नवीन अधिकारी कधी मिळणार, याची प्रतीक्षा करावी लागेल.

Web Title: Temporary shoulder to PMP again; No full time officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.