सिंहगडावरील ई-बस सेवेला तात्पुरती स्थगिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 02:09 PM2022-05-17T14:09:07+5:302022-05-17T14:09:50+5:30
अपघाताचा धोका निर्माण झाल्याने ई बस सेवा काही काळापुरती बंद....
पुणे : अरुंद रस्ते, जागेवरचे अवघड वळण, चढता घाट, तीव्र उतार यामध्ये बसेसचे चार्जिंग मोठ्या प्रमाणात खर्ची पडत आहे. परिणामी वारंवार बस रस्त्यातच बंद पडत आहेत. तसेच अपघाताचा धोका निर्माण झाल्याने ई बस सेवा काही काळापुरती बंद करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. तसेच बसेसची संख्या व चार्जिंग पॉइंटची संख्या वाढविणे आवश्यक आहे. अरुंद रस्त्यामुळे छोट्या बसेसची संख्या केल्या आहेत. अवघ्या १५ दिवसांत ई- ई-बसेस सेवा चालू झाल्यापासून बस सेवा बंद करावी लागत आहे.
सातत्याने वाढणाऱ्या वाहनांच्या गर्दीमुळे किल्ले सिंहगडावर सातत्याने होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी व प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने १ मे २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सिंहगड किल्ल्याकरिता ई-बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला होता. मात्र, ई-बस वारंवार रस्त्यातच बंद पडत असल्याने अवघ्या १५ दिवसांत सेवा बंद करावी लागत असल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
२ मे पासून प्रायोगिक तत्त्वावर सिंहगडावर खासगी वाहने बंद करून ई-बस सेवा चालू केली. या करिता सिंहगड वाहनतळावर चार्जिंग स्टेशन उभारले होते. या बस सेवेला पर्यटकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. उपलब्ध असलेल्या सर्व ई-बसेस या मार्गावर धावल्या. परंतु, प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता उपलब्ध असलेल्या ई-बसेसची संख्या अपुरी पडत आहे.
लहान बसेसची गरज
झालेला किरकोळ अपघात व इतर अडथळ्यांचा विचार करता या मार्गावर नवीन लहान आकाराच्या ई-बसेसची आवश्यकता आहे. तसेच रस्त्याची दुरुस्ती होणे देखील आवश्यक आहे त्याकरिता लागणारा वेळ लक्षात घेता या मार्गावरील ई बस सेवा १७ मे २०२२ पासून तात्पुरत्या कालावधीकरिता स्थगित करून नवीन बस आवश्यक संख्येत उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा चालू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे पीएमपीएस प्रशासनाकडून स्पष्ट केले.