पावसाचे पाणी साचलेल्या खाणीत पोहण्याचा मोह; १३ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 01:22 PM2024-08-18T13:22:47+5:302024-08-18T13:23:14+5:30

उद्यानातील पावसाचे पाणी साचलेल्या खाणीतील खड्ड्यामध्ये तेरा ते चौदा वर्षांची चार मुले पोहायला गेली होती, त्यामध्ये एकाचा बुडून मृत्यू झाला

Temptation to swim in a rainwater pit 13-year-old boy drowned | पावसाचे पाणी साचलेल्या खाणीत पोहण्याचा मोह; १३ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

पावसाचे पाणी साचलेल्या खाणीत पोहण्याचा मोह; १३ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

वारजे : केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडून साकारण्यात आलेल्या वारजेतील रामनगर-गणपती माथा टेकडीवरील नागरी वन उद्यानातील खाणीतील पाण्यामध्ये पोहायला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. दक्ष सुशांत कांबळे (वय १३, रा. रामनगर वैदुवाडी वारजे) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजेतील रामनगर टेकडी परिसरालगत नागरी वन उद्यान असून, या उद्यानातील पावसाचे पाणी साचलेल्या खाणीतील खड्ड्यामध्ये गुरुवारी सुटीच्या दिवशी (दि. १५ ऑगस्ट) दुपारी साधारण तेरा ते चौदा वर्षांची चार मुले पोहायला गेली होती. त्यातील मृत दक्ष कांबळे हा पोहताना पाण्यात बुडाला. त्या सोबतची तिन्ही मुले घाबरून गेल्याने त्यांनी दक्ष पाण्यात बुडाल्याची माहिती घरी दिली नाही. मात्र, सायंकाळपर्यंत दक्ष घरी न आल्याने घरच्यांनी शोधाशोध करून त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता तो खाणीत पोहायला गेल्यावर पाण्यात बुडाल्याची माहिती दिली. या घटनेची माहिती वारजे माळवाडी पोलिसांना मिळताच वारजे पोलिस आणि वारजे अग्निशमन दलाचे जवान रात्रीच्या वेळी घटनास्थळी दाखल होत शोध कार्य सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळपास दोन तास बोटीच्या माध्यमातून शोध कार्य केले. त्यानंतरही मृतदेह सापडला नाही. त्यानंतर पोलिसांनी आणलेल्या एका व्यक्तीने रात्री सव्वाबाराच्या सुमारास खाणीतील पाण्यात उतरून मुलाचा मृतदेह शोधला. त्यानंतर मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालय येथे पाठविण्यात आला.

Web Title: Temptation to swim in a rainwater pit 13-year-old boy drowned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.