बारामतीचा नादच खुळा! सरपंच निवडणुकीसाठी आणले चक्क दहा बाऊन्सर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 04:36 PM2021-02-25T16:36:58+5:302021-02-25T16:37:26+5:30
पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे....
बारामती : एकीकडे सरपंच पदाच्या निवडीनंतर पैशांचा पाउस पडल्याची घटना ताजी असतानाच आता सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी चक्क बाउन्सर आणले गेले आहेत. बारामती तालुक्यातील शिरष्णे गावातली ही घटना आहे. या गावच्या सरपंच निवडणुकीत चक्क दहा बाऊन्सर आणले गेले. पोलीसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.
शिरष्णे गावची गुरुवारी(दि २५) सरपंच निवड होती. या पदासाठी बिनविरोध निवडीची कोणतीही शक्यता नव्हती,या पार्श्वभूमीवर सरपंचपदाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेपूर्वी ग्रामपंचायतीसमोर दहा बाऊंसर्स येऊन थांबले. त्यानंतर हा एकच चर्चेचा विषय ठरला.
बारामती तालुक्यात काही गावांत सत्तांतर झाले आहे. तालुक्यात ४८ गावांत निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. मात्र, सर्वच गावात ग्रामंपचायत निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पडली आहे. तसेच कालपासुन सुरु असलेली सरपंचपद निवडणूक देखील त्याला अपवाद नाही. सरपंच निवड देखील शांततेत सुरु आहेत. मात्र, शिरष्णे गावात प्रथमच निवडणुकीच्या निमित्ताने बाऊन्सर आणण्यात आले. त्याची सर्वत्र चर्चा होती. सरपंचपदाची निवडणूकीसाठी काहीसे तणाव निर्माण होण्याची चर्चा होती. ही चर्चा पोलिसांपर्यत पोहचली का नाही,याबाबत ग्रामस्थांचे तर्क-वितर्क सुुरु होते.
ही निवडणूक दबावाखाली झाल्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी आक्षेप घेण्यात आला. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया रद्द करता येत नसल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी संबधित अर्ज निकाली काढल्याचे समजते. दरम्यान,हे बाउन्सर नेमके कोणी आणले,हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
कोरोनाच्या नियमावलीकडे या बाऊन्सर मंडळींनी दुर्लक्ष केल्याचे यावेळी दिसून आले. येथे आणलेले बाऊंसर विनामास्क असल्याचे व्हायरल झालेल्या फोटोवरुन दिसून आले.त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.सर्वसामान्यांवर या कारणासाठी दंडात्मक कारवाईचा दंडुका उगारणारे प्रशासन बाऊन्सरला मोकळीत का देते,हा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक सोमनाथ लांडे यांनी याबाबत माहिती घेऊन आवश्यक ती कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले.
——————————