जिल्ह्यातील पाॅझिटिव्हमध्ये एका महिन्यात दहा टक्क्यांची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:11 AM2021-05-10T04:11:57+5:302021-05-10T04:11:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ग्रामीण भागात गेल्या एक-दोन आठवड्यापासून अँटिजन किटचा तुटवडा असल्याने तुलनेत अपेक्षापेक्षा कमी प्रमाणात कोरोना ...

Ten per cent decline in positives in the district in a month | जिल्ह्यातील पाॅझिटिव्हमध्ये एका महिन्यात दहा टक्क्यांची घट

जिल्ह्यातील पाॅझिटिव्हमध्ये एका महिन्यात दहा टक्क्यांची घट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ग्रामीण भागात गेल्या एक-दोन आठवड्यापासून अँटिजन किटचा तुटवडा असल्याने तुलनेत अपेक्षापेक्षा कमी प्रमाणात कोरोना चाचण्या झाल्या आहेत. असे असले तरी मागील काही आठवड्यांचा विचार करता एकूण झालेल्या चाचण्या बाधित रुग्णसंख्या लक्षात घेतली तर एप्रिलच्या तुलनेत मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाॅझिटिव्ह दर तब्बल ३९.४ टक्क्यांवरून थेट ३१ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना पाॅझिटिव्ह दर कमी होत असल्याने समाधानाची बाब आहे.

पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने ग्रामीण भागात मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्यास सुरुवात झाली. मार्चच्या पहिल्या आठवड्यात १७ हजार ३५३ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली, यात २ हजार ७०२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले. त्या वेळी पॉझिटिव्ह दर १५.६ एवढा होता. मार्चपासून चाचण्यांचे प्रमाण आणि रुग्णसंख्या वाढत गेली. मार्चअखेरपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या आणि पॉझिटिव्हमध्ये प्रचंड मोठी वाढ झाली. मार्च पहिल्या आठवड्यात असलेला १५ टक्के पॉझिटिव्ह दर तब्बल तीनपटीने वाढून ३९ टक्क्यांवर जाऊन पोहोचला. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात यात आणखी वाढ झाली. परंतु १५ एप्रिल नंतर रुग्ण संख्या वाढत असली तरी पाॅझिटिव्ह हळुहळु कमी होत गेला. सध्या रुग्ण बाधिताचा दर ३१ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. हा फार कमी नसला तरी एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात परिस्थितीत सुधारणा होत असल्याची समाधानाची बाब आहे.

--

आठवडा चाचण्या बाधित रुग्ण पाॅझिटिव्ह

४-१० मार्च १७३५३ २७०२ १५.६

११-१७ मार्च २१५०० ४३२१ २०.१

१८-२४ मार्च २६३१६ ६६३३ २८.१

२५-३१ मार्च २३७६५ ९२७१ ३९.०

१-७ एप्रिल ३५४२६ १३९५७ ३९.४

८-१४ एप्रिल ४७९३३ १७८४५ ३७.२

१५-२१ एप्रिल ६१०१९ २०१११ ३२.९

२२-२८ एप्रिल ६४९३५ २०४६७ ३१.५

२९ एप्रिल ते ५ मे ८५५३२ २५८८१ ३१.०

--

अँटिजन किटचा तुटवडा

जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यांपासून अँटिजन किट्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळेच पुणे जिल्हा प्रशासनाला जिल्ह्यातील बहुतांश हॉटस्पॉट गावातील कोरोना तपासणीचे कॅम्प रद्द करावे लागले होते. अँटिजन टेस्टमुळे हाॅटस्पाॅट गावात व इतर ठिकाणी कोरोना प्रादुर्भाव काही प्रमाणात रोखण्यास मदत होते, पण आता किट्स कमी पडत असल्याने अडचण आहे.

---

नियमानुसार अँटिजन किट्सचा वापर

एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढली. यादरम्यान जिल्ह्यात अँटिजन चाचण्यांचे प्रमाण प्रमाणापेक्षा अधिक झाले. हाॅटस्पाॅट गावांमध्ये कॅम्प घेऊन सरसकट चाचण्या केल्या. परंतु अँटिजन चाचण्या कुणाच्या व किती प्रमाणात करायच्या यांचे नियम ठरवून दिले आहे. काही निर्बंधदेखील घातले आहेत. सध्या जिल्ह्यात या नियमानुसार अँटिजेन चाचण्या करण्यात येत आहेत.

- डाॅ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: Ten per cent decline in positives in the district in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.