शहरातील दहा रुग्णालयांमध्ये आता शहरी गरीब योजना नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:12 AM2021-06-16T04:12:47+5:302021-06-16T04:12:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य शासनाची ‘महात्मा जनआरोग्य योजना’ लागू असलेल्या शहरातील दहा रुग्णालयांमध्ये १० जूनपासून महापालिकेची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य शासनाची ‘महात्मा जनआरोग्य योजना’ लागू असलेल्या शहरातील दहा रुग्णालयांमध्ये १० जूनपासून महापालिकेची वैद्यकीय उपचारात सवलत देणारी ‘शहरी गरीब वैद्यकीय साहाय्य योजना’ बंद करण्यात आली आहे़ एकाच ठिकाणी महापालिकेसह राज्य शासनाच्या अशा दोन वैद्यकीय सवलत लागू असल्याने महापालिकेने हा निर्णय घेतला.
याबाबतचे आदेश आरोग्य अधिकारी डॉ़ आशिष भारती यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहेत़ औंध येथील एम्स हॉस्पिटल, कात्रज येथील भारती विद्यापीठ, कोथरूड येथील देवयानी हॉस्पिटल, कर्वे रोड येथील गॅलॅक्सी हॉस्पिटल, दत्तवाडी येथील ग्लोबल हॉस्पिटल, खराडी येथील पवार मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल, बिबवेवाडी येथील राव नर्सिंग होम, खराडी येथील श्री हॉस्पिटल व कसबा पेठ येथील सह्याद्री सूर्या हॉस्पिटलसह ससून जनरल हॉस्पिटल पुणे स्टेशन या दहा ठिकाणी आता शहरी गरीब योजना लागू राहणार नाही़
महापालिकेने ८ जून रोजी घेतलेल्या अंशदायी वैद्यकीय साहाय्य योजना समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला आहे़ यामुळे १० जूनपासून आता या १० रुग्णालयांकरिता आरोग्य विभागाकडून शहरी गरीब योजनेंतर्गत वैद्यकीय सेवा सुविधेचे हमीपत्र देण्यात येणार नाही़ तसेच १० जूनपासून पुढील रूग्णालयांची या योजनेतील वैद्यकीय देयके (बिल) आरोग्य विभागाकडून मंंजूर केले जाऊ नये, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे़
--------------------------
महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे आरोग्यमित्र कुठे?
शहरातील या दहा रुग्णालयांमधील शहरी गरीब योजना महापालिकेने बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी, आता राज्य शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी नियुक्त केलेले आरोग्यमित्र या रुग्णालयात २४ तास कार्यरत असणे आवश्यक आहे़ मात्र अनेक ठिकाणी हे आरोग्यमित्र केवळ शासनाच्या मस्टरवर हजेरी लावून निघून जात असल्याचे आढळून येत आहे़ त्यामुळे सर्वसामान्य गरीब रुग्णांना वैद्यकीय साहाय्य मिळवून देण्यासाठी सदर आरोग्यमित्र २४ तास रुग्णालयात उपलब्ध राहणे गरजेचे बनले आहे़
------------------------------