दहा शिकाऱ्यांना अटक
By admin | Published: December 10, 2015 01:31 AM2015-12-10T01:31:29+5:302015-12-10T01:31:29+5:30
भीमाशंकर अभयारण्यातील यळवली गावाच्या जवळ जंगली प्राण्यांची शिकार करताना १० शिकाऱ्यांना वन्यजीव विभागाने पकडले आहे.
भीमाशंकर : भीमाशंकर अभयारण्यातील यळवली गावाच्या जवळ जंगली प्राण्यांची शिकार करताना १० शिकाऱ्यांना वन्यजीव विभागाने पकडले आहे. त्यांच्याकडून दोन बंदुका, मारलेला ससा, जळलेल्या अवस्थेतील प्राणी मिळून आले. वनक्षेत्रपाल तुषार ढमढेरे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सापळा लावून दि. ८ रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही कारवाई केली.
कोकणातून काही शिकारी शिकार करण्यासाठी अभयारण्यात आल्याची बातमी त्यांना मिळाली होती. त्यांनी सर्व वनरक्षकांना जंगलात फिरवून शिकाऱ्यांचा ठिकाणा शोधून काढला. खेड तालुक्यातील यळवली गावाच्या हद्दीत आंबेनळीच्या जवळ शिकारी रात्री मुक्कामी असल्याचे वनरक्षक बी. टी. खरात यांना आढळून आले. रात्री पकडण्यापेक्षा पहाटे शिकाऱ्यांना पकडण्याचे नियोजन तुषार ढमढेरे यांनी केले व रात्रीपासूनच त्यांच्यावर नजर ठेवली.
ढमढेरे यांच्यासह वनमजूर डी. आर. सुपे, वनपाल पी. पी. लांघी असे सुमारे १२ वनकर्मचाऱ्यांच्या टीमने दि. ८ रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास सापळा रचून शिकाऱ्यांवर धाड टाकली. सर्वप्रथम बंदुका ताब्यात घेऊन आरोपींना पकडले. यांतील काही आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, योग्य प्रकारे सापळा लावलेला असल्यामुळे सर्व आरोपी पकडण्यात यश आले. कारवाईच्या ठिकाणी शिकाऱ्यांकडून ठासणीची बंदूक, हत्यारे, मारलेला ससा व जळालेल्या अवस्थेतील प्राणी मिळून आला. हा प्राणी मुुंगूस किंवा उदमांजर असल्याचा अंदाज वनकर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या आरोपींमध्ये गुरुनाथ तातू वारे, मोहन वसंत वारे, गणेश जैतू उघडे, बळीराम जाणू दरवडा, रवी शंकर पादीर, चिंतामण रामा उघडे, मंगेश गोटीराम हिंदोळ, भरत भगवान मांगे, केतन वसंत वारे व माधव गोविंद उघडे या १० जणांचा समावेश असून, सर्व आरोपी धोत्रेवाडी (ता. कर्जत, जि. रायगड) येथील आहेत. या सर्व आरोपींना सहायक मुख्य संरक्षक कीर्ती जमदाडे-कोकाटे व तुषार ढमढेरे यांनी राजगुरुनगर येथे न्यायालयात हजर केले असता, दि. १४ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. या आरोपींवर वन्यजीव संरक्षक अधिनियम १९७२ नुसार विनापरवाना अभयारण्यात प्रवेश करणे, विनापरवाना अभयारण्यात शस्त्र बाळगणे, अभयारण्यात वस्तू पेटविणे, अभयारण्यात शिकार करणे अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक मुख्य संरक्षक कीर्ती जमदाडे-कोकाटे पुढील तपास करीत आहेत.
शिकार करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी वन्यजीव अधिनियमानुसार शिक्षा होऊ शकते. भीमाशंकरचे जंगल हे जैवविविधतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठिकाण असून, सगळ्यांकडून त्याचे संरक्षण झाले पाहिजे. भीमाशंकरच्या जंगलात आठ वनसंरक्षण समितीच्या मार्फत काम सुरू आहे़ स्थानिकही जंगलाबाबत जागरूक होत आहेत.(वार्ताहर)