अरण्येश्वरमधील टांगेवाले कॉलनीत 10 जणांचा मृत्यू; पाच मृतदेह सापडले; मृतांमध्ये तीन लहानग्यांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 07:36 AM2019-09-26T07:36:11+5:302019-09-26T07:36:24+5:30
पुण्यात बुधवारी झालेल्या प्रचंड पावसामुळे आंबील ओढ्याला आलेल्या पुरात अरण्येश्वर येथील टांगेवाले कॉलनीमधील दहा जणांचा मृत्यू झाला.
पुणे : पुण्यात बुधवारी झालेल्या प्रचंड पावसामुळे आंबील ओढ्याला आलेल्या पुरात अरण्येश्वर येथील टांगेवाले कॉलनीमधील दहा जणांचा मृत्यू झाला. यातील पाच मृतदेह मिळून आले असून, अन्य मृतदेहांचा शोध घेण्याचे काम एनडीआरएफच्या तीन पथकांकडून सुरू होते.
टांगेवाले कॉलनी ही टांगे चालवणाऱ्यांची कॉलनी आहे. ही कॉलनी नेमकी नाल्याला खेटून आहे. बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्यावर नाल्याचे पाणी वाढले. अक्षरशः रौद्र रूपाने वाहणारे पाणी कॉलनीतील घरांमध्ये घुसले. भिंती खचल्याने येथील काही घरे पडली. अंगावर भिंती पडल्याने काही जणांच्या मृत्यू झाला. तर काही जण प्रवाहासोबत वाहून गेल्याचे स्थानिकांनी सांगितले.
आतापपर्यंत पाच मृतदेह आढळले आहेत. यातील तीन मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून, अन्य दोन मृतदेह काढण्याचे काम एनडीआरएफची तीन पथकं करीत होते. येथील हजारे नामक महिला त्यांची आठ आणि दहा वर्षांची दोन मुले, रवी आमले (वय 15), संतोष कदम (वय 45) अशी आतापर्यंत मृतदेह सापडलेल्यांची नावे आहेत. आणखी मृतदेहांचा शोध सुरू आहे.