दहा जणांच्या टोळक्याने केली मारहाण, अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:18 AM2017-12-29T00:18:53+5:302017-12-29T00:18:55+5:30
आंदोलन केले म्हणून मारहाण झाल्याची तक्रार एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने गुरुवारी (दि.२८) चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे.
चाकण : आंदोलन केले म्हणून मारहाण झाल्याची तक्रार एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने गुरुवारी (दि.२८) चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे. संबंधित पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून चाकण पोलिसांनी दहा अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार एस आर हरगुडे यांनी दिली. दरम्यान संबंधित घटनेबाबत पोलिसांनी संशय व्यक्त केला असून मारहाणीच्या या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेण्यात आला असला तरी सदरच्या मारहाण नाट्याची खातरजमा करून घेण्याचे प्रयत्न चाकण पोलिसांनी सुरु केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश गोपीनाथ शिंदे ( वय ३२ वर्षे, रा.वाकी खुर्द, चाकण, ता. खेड, जि. पुणे ) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार खेड व चाकण परीसरात सामाजिक कार्य करत असतो. गुरुवारी (दि.२८) सकाळी पावणे बाराच्या सुमारास चाकणच्या तळेगाव चौक येथील कामगार नाक्यावर कामगारांच्या समवेत बोलत असताना तोंडाला रुमाल बांधलेले ९ ते १० जण हातात काठ्या व गज घेवुन आले. त्यातील एकाने दम दिला कि, ‘तु उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय खेड यांचे ऑफिसवर मोर्चा का काढला, व तु अवैध्य धंदयाबाबत तक्रार का दिली व वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार का केलीस?’ असे म्हणून मारहाण केली. पोलिसांनी संबंधित पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. मात्र संबंधित घटनेची खातरजमा करण्यात येणार असल्याचे सांगत पोलिसांनी या मारहाणीच्या घटनेबाबत संशय व्यक्त केला आहे. चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.