मिळकतीच्या जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:13 AM2021-02-13T04:13:32+5:302021-02-13T04:13:32+5:30
पुणे : दहा एकर क्षेत्राच्या मिळकतीच्या जागेवर पत्र्याची शेड मारून अतिक्रमण करीत, संबंधिताने ही जागा पुन्हा पाहिजे, असल्यास प्रत्येकी ...
पुणे : दहा एकर क्षेत्राच्या मिळकतीच्या जागेवर पत्र्याची शेड मारून अतिक्रमण करीत, संबंधिताने ही जागा पुन्हा पाहिजे, असल्यास प्रत्येकी दहा लाख रुपये द्या, नाहीतर इथे पाय ठेवायचा नाही, अशी धमकी दिल्याप्रकरणी दहा जणांवर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
रणवीरसिंग ईश्वरसिंग दुधाणी, अवतारसिंग दुधाणी, मिंटूसिंग दुधाणी, सिकंदरसिंग टाक (आंबेडकरनगर वसाहत, गुलटेकडी) यांच्यासह आणखी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका ४१ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. मार्च २०२० ते ११ फेब्रुवारी २०२१ पर्यंत हा प्रकार सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे भाऊ यांच्या मालकीची मौजे उरूळी देवाची (ता. हवेली) येथील सर्व्हे नं.१६/१/२/२ मधील १० एकर क्षेत्राची मिळकत आहे. मात्र आरोपींनी फिर्यादी यांना जाण्यास अडवून त्या जागेवर पत्र्याचे शेड मारून ‘या जागेवर यायचे नाही’ अशी धमकी देऊन त्यांना शिवीगाळ केली. ही जागा पुन्हा पाहिजे असल्यास प्रत्येकी दहा लाख रुपये द्या, नाहीतर इथे पाय ठेवायचा नाही. परत इकडे दिसला तर हात-पाय तोडून टाकीन. पैसे दिले तर जागा मिळेल नाहीतर तुमची जागा विसरून जायचे अशी धमकी दिली, या आरोपींनी फिर्यादी यांच्या प्रमाणेच इतर अनेक लोकांना दमदाटी करून जमिनीचे ताबे घेतलेले आहेत. या परिसरात आरोपींनी दहशतीचे वातावरण निर्माण केले असून, या परिसरातील सर्व जागा मालक त्यांच्या दहशतीमुळे भयभीत झाले आहेत. त्यामुळे या आरोपींवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक आर. एस. ढावरे पुढील तपास करीत आहेत.
--------------------------