Pune Metro | पुण्यातील दुसऱ्या मेट्रो मार्गाचे दहा खांब उभारले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 09:57 AM2022-05-27T09:57:22+5:302022-05-27T10:00:01+5:30
२३ किलोमीटरच्या या मार्गावरील पहिले दहा खांब बांधून तयार...
पुणे : शहरातील हिंजवडी ते शिवाजीनगर या दुसऱ्या मेट्रो मार्गाचे अनेक महिने रखडलेले काम आता मात्र जोरात सुरू झाले आहे. २३ किलोमीटरच्या या मार्गावरील पहिले दहा खांब बांधून तयार झाले असून, अन्य कामांनाही सुरुवात झाली आहे. पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर हे काम होत आहे.
पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) व खासगी कंपनी यांची मिळून पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (पीआयसीटीएमआरएल) ही कंपनी या कामासाठी स्थापन करण्यात आली आहे. २६ मेपर्यंत तब्बल १० हजार ५४९ चौरस मीटरचे बॅरिकेडिंगचे काम पूर्ण झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्ता व हिंजवडी येथे खांब उभे करण्याचे काम सुरू आहे. एकूण दहा खांब बांधून तयार झाले आहेत. याशिवाय प्रस्तावित मेट्रो स्थानकांसाठीही खोदकाम करण्यात येत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
हिंजवडी येथील उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या (हाय टेन्शन लाइन्स) शिफ्टिंगचेही काम वेगाने सुरू आहे. सध्या सव्वाआठ किलोमीटर लाइन्सचे शिफ्टिंग काम पूर्ण झाले आहे. आता अखेरच्या साडेचारशे मीटर अंतराच्या लाइन शिफ्टिंगचे काम उरलेले आहे. उच्च दाबाच्या विद्युत पोलचे शिफ्टिंग व नव्याने उभारणी हे मेट्रोसाठीचे पूरक काम आहे. अशा कामांनाही आता वेग देण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.