बंद दरम्यान हयात हॉटेलमध्ये घुसून मोडतोड करणाऱ्या दहा शिवसैनिकांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 09:00 PM2018-08-11T21:00:50+5:302018-08-11T21:31:09+5:30
मराठा आरक्षणासाठी ९ आॅगस्ट रोजी राज्यभरात महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यावेळी हयात हॉटेल येथे अंदाजे २० ते २५ जणांच्या जमावाने हॉटेलच्या आवारातील खुर्च्या व साहित्याची मोडतोड केली होती.
विमाननगर - मराठा आरक्षणासाठी राज्यभर पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान कल्याणीनगर येथील हयात हॉटेलमध्ये घुसून मोडतोड मारहाण करणाऱ्या दहा शिवसैनिकांना येरवडा पोलिसांनी शनिवारी दुपारी अटक केली . अटक आरोपींमध्ये शिवसेना गटनेते संजय भोसले यांच्या भावाचा समावेश असुन आरोपींना १३ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
अटक केलेल्या आरोपींमध्ये शिवसेनेचे पुणे महापालिकेचे नगरसेवक व गटनेते संजय भोसले यांचा भाऊ चंद्रकांत भोसले यांचा देखील समावेश आहे.
या प्रकरणी भास्कर रामराव भोसले (वय५१रा. रामनगर येरवडा), आशिष यशवंत शिर्के (वय २१रा.नागपूर चाळ येरवडा),चंद्रकांत शशिकांत भोसले (वय४८, रामनगर येरवडा ),शशिकांत चंद्रकांत बाराते (वय २४रा.लक्ष्मीनगर येरवडा ),सचिन दिनकर भोसले (वय ४७ रा.रामनगर येरवडा),दिलीपसिंह अष्टभुजा ठाकूर (वय २७ रा.रामनगर येरवडा),प्रमोद रविकांत जाधव (वय २८रा.रामनगर येरवडा),प्रशांत कृष्णा मोरे (वय३२ रा. रामनगर येरवडा),किशोर यशवंत काटकर (वय ५०,रा.बी.टी.कवडे रोड घोरपडी), यशवंत उर्फ सुनील भानुदास मोरे (वय५०, रा. रामनगर येरवडा) यांना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे .
मराठा आरक्षणासाठी ९ आॅगस्ट रोजी राज्यभरात महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते.दरम्यान, दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कल्याणीनगर येथील हयात हॉटेल येथे अंदाजे २० ते २५ शिवसैनिकांनी ८ ते ९ दुचाकीवरून येऊन बेकायदेशीरपणे जमावाने हॉटेलच्या आवारात घुसून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच त्याच्या हातातील मोबाइल फोडून हॉटेलच्या आवारातील खुर्च्या व साहित्याची मोडतोड केली होती. या प्रकरणी हॉटेल व्यवस्थापनाने दिलेल्या तक्रारीवरून अंदाजे २० ते २५ शिवसैनिकांविरुद्ध येरवडा पोलिसांनी विविध गंभीर गुन्हे दाखल केले होते.
याप्रकरणी अधिक तपासात हयात हॉटेलच्या आवारात मिळालेल्या सीसीटी फुटेजवरून गुन्ह्यातील १० आरोपींना शनिवारी दुपारी रामनगर येरवडा येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे,उपनिरीक्षक रवींद्र गवारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळसाहेब बहिरट, पोलीस हवालदार हनुमंत जाधव, हरिश्चंद्र मोरे, पोलीस नाईक किशोर सांगळे ,अशोक गवळी यांच्या पथकाने शनिवारी दुपारी बारा वाजेणेच्या सुमारास रामनगर येथे अटक केली. अटक आरोपींना १३ आॅगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. गंभीर गुन्ह्यातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे करत आहेत .