धनकवडी परिसरातील दहा मंदिरे पाडली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 02:59 AM2018-12-16T02:59:23+5:302018-12-16T03:03:18+5:30
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश : मध्यरात्री केली कारवाई, घरांना लावल्या बाहेरून कड्या
धनकवडी : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंतर्गत व मुख्य रस्त्यावर असलेल्या वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दहा अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये धनकवडी परिसरातील चार व सहकारनगर परिसरातील सहा अशा एकूण दहा मंदिरांवर कारवाई करून पाडण्यात आली.
महापालिकेच्या धनकवडी-सहकारनगर आणि कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्यावतीने स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्तात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ते शनिवारी पहाटे पाचपर्यंत ही कारवाई करण्यात आली. बालाजीनगर येथे जिजामाता चौक ते पवार हॉस्पिटलच्यादरम्यान चार मंदिराच्यावर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पवार हॉस्पिटलशेजारी असलेल्या संत सेना महाराज व ज्ञानेश्वर माऊली महाराज, जिजामाता चौकातील बालाजी मित्रमंडळाचे गणेश मंदिर, तर सर्व्हे नंबर २२ गोविंद हाईट्सच्या बाजूला असलेल्या सिद्धिविनायक मंदिरावर ही कारवाई करण्यात आली.
ही कारवाई करत असताना मंदिराच्या शेजारी पार्किंग केलेल्या सतीश प्रभाकर नाईक (रा. गोविंद हाईट्स) यांच्या ओमनी गाडीची पाठीमागील बाजूची काच फुटून नुकसान झाले. धनकवडीमधील चव्हाणनगर परिसरातील शनी मारुती मंदिराच्या समोर असलेले गणपती मंदिरावरसुद्धा महापालिका अतिक्रमण विभागाने पहाटे ३ वाजता कारवाई करून पाडण्यात आले. यावेळी शेजारच्या घरांना बाहेरून कड्या लावण्यात आल्या होत्या. पोलीस बंदोबस्तात रात्री हे मंदिर पाडल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मनात प्रचंड असंतोष असून घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली होती.
पहाटे ३
वाजता पोलीस
बंदोबस्तात कारवाई;
लोकांमध्ये
असंतोष
गणपती मंदिर शेजारी असलेल्या सर्व्हे नंबर ११ मधील या चाळींच्या घरांना बाहेरून कड्या लावण्यात आल्या होत्या. यामध्ये रुपाली नरके, शेखर चव्हाण, अनिल नेटके, नरेश परिहार, स्वप्निल लोखंडे यांच्या घरांना कड्या लावल्या. मंदिरात झोपलेल्या अभिमान आरकडे (वय ८५) यांना काठी मारून मंदिरातून बाहेर काढले.
सहकारनगर परिसरातील पद्मावती येथील ओम मेडिकलच्या समोर असलेले साईबाबा मंदिर, वाळवेकर लॉजच्या भिंतीलगत असलेले शनी मारुती मंदिर, डांगेवाला कॉलनीमधील जय महाराष्ट्र मंडळ व विनायक मित्र मंडळांचे गणपती मंदिर, शिंदे हायस्कूल, स्टेट बँकेच्या जवळील व्यापारी मित्र मंडळाचे गणेश मंदिर अशा सहा मंदिरांच्यावर कारवाई करून पाडण्यात आली.
धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय अतिक्रमण विभागाचे निरीक्षक राजू लोंढे म्हणाले, की सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांचे अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याच्या आदेशानुसार, महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप, धनकवडी-सहकारनगर व कोंढवा-येवलेवाडी विभागाचे सहायक आयुक्त युनूस पठाण व कारवाई मुख्य नियंत्रक रवींद्र घोरपडे यांच्या नियंत्रणाखाली सार्वजनिक रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या अनधिकृत दहा धार्मिक स्थळांवर ही कारवाई करण्यात आली.
माजी महापौर नगरसेवक दत्तात्रय धनकवडे म्हणाले, की कारवाई करण्याबाबत दुमत नाही. मात्र या कारवाया पक्षपाती आहेत. भारतीय जनता पक्षाच्या मंडळांवर या कारवाया न होता राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व इतर पक्षांच्या मंडळाच्या मंदिरांवर या कारवाया करण्यात आल्या आहेत.
नगरसेवक प्रकाश कदम यांच्या बालाजी मित्र मंडळाचे गणेश मंदिरावर कारवाई करून पाडण्यात आले. यावेळी कदम म्हणाले, हे मंदिर तीस वर्षांपूर्वी स्थापन केले. यावेळी येथे लोकवस्तीसुद्धा नव्हती.
हळूहळू लोक वस्ती वाढत गेली. नागरिकांची श्रद्धा या मंदिरावर आहे.
खरंच ही मंदिरे वाहतुकीस अडथळा?
नगरसेवक महेश वाबळे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा मी आदर करतो. परंतु रात्रीची कारवाई चुकीची आहे. अनधिकृत धार्मिक स्थळांच्यावर कारवाई करताना प्रशासनाने जी तत्परता दाखवली अशीच तत्परता पदपथांवर कारवाई करून दाखवली असती तर पादचाºयांनी मोकळा श्वास घेतला असता. कारण याअगोदर पदपथावर अतिक्रमण काढावे, असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे.
अभिमान आरकडे म्हणाले, की मी गेले कित्येक वर्षे रात्री या मंदिरात झोपतो. शुक्रवारी मी नेहमीप्रमाणे मंदिरात झोपलो असताना मला काठीने मारून बाहेर हाकलून दिले, मला काही झाले काहीच कळले नाही. नंतर मी समोरच्या शनी मारुती मंदिरात येऊन झोपलो. सकाळी उठून पाहतो तर संपूर्ण मंदिर जमीनदोस्त झाले आहे.
सर्व्हे नंबर १२ राजीव गांधी वसाहतीमधील रहिवासी रुपाली नेटके, शेखर चव्हाण, नरेश परिहार म्हणाले, की शुक्रवारी रात्री आम्ही नेहमीप्रमाणे झोपलो असता रात्री तीन वाजता अचानक बाहेर गोंधळ चालल्याचे लक्षात आले, म्हणून आम्ही बाहेर येण्यासाठी दार उघडण्याचा प्रयत्न केला तर बाहेरून दरवाजा बंद असल्याचे दिसून आले.
मंदिर एका कोपऱ्यात आहे. या मंदिराचा वाहतुकीला अजिबात अडथळा नसताना मंदिर पाडल्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.