दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त
By admin | Published: February 18, 2017 03:31 AM2017-02-18T03:31:13+5:302017-02-18T03:31:13+5:30
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी होत असलेल्या मतदानासाठी तब्बल १० हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी होत असलेल्या मतदानासाठी तब्बल १० हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी आणि मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली असून, बंदोबस्तावर स्वत: पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला व सहआयुक्त सुनील रामानंद लक्ष ठेवून असतील.
२०१२मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदान केंद्रांसह मतदारांच्या संख्येत वाढ झालेली आहे. पुण्यात ४१ प्रभागांसाठी ८७९ मतदान केंद्रांसह ३ हजार १३२ बूथवर मतदान होईल. तर, पिंपरी-चिंचवडसाठीच्या ३२ प्रभागांतील ४८८ मतदान केंद्रांसह एक हजार ५७८ बूथवर मतदान होणार आहे. यासोबतच जिल्हा परिषदेचा पोलीस आयुक्तालयातील काही भाग येत असल्याने तेथील २८० बूथ निश्चित करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणांवर शनिवारपासून बंदोबस्त तैनात करण्यात येईल.
अतिरिक्त आयुक्त शशिकांत शिंदे, प्रदीप देशपांडे यांच्यासह सर्व उपायुक्त, सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक, सहायक तसेच उपनिरीक्षक बंदोबस्तामध्ये तैनात राहतील. त्यांना शहर पोलिसांच्या फौजफाट्यासह गृहरक्षक दलाचे जवान पुरविण्यात येणार आहेत. यासोबतच राज्य राखीव दलाच्या तुकड्या, दंगल नियंत्रण पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, शीघ्र कृती दलाची पथके बंदोबस्तामध्ये नेमण्यात आली आहेत. सहायक आयुक्त आणि त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांचे स्ट्रायकिंग फोर्स तयार करण्यात आले आहेत. यासोबतच भरारी पथकांमार्फत हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे विशेष शाखेचे उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी सांगितले. पुण्यातील काही मतदारसंघ संवेदनशील असल्याचे पोलिसांच्या अहवालात पुढे आले आहे. या ठिकाणी जादा बंदोबस्त तसेच राज्य राखीव पोलीस बलाच्या तुकड्या ठेवण्याचे नियोजन आहे.