इंदापूरात शेततळ्यात बुडून नऊ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 18:53 IST2021-09-21T17:50:19+5:302021-09-21T18:53:36+5:30
मंगळवार सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास चिमुकल्याचे मृत शरीर शेततळ्याच्या पाण्यातून काढण्यात आले.

इंदापूरात शेततळ्यात बुडून नऊ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
इंदापूर : इंदापूर शहरातील सरस्वतीनगर येथील अवघ्या नऊ वर्षाच्या आर्यन मच्छिंद्र नाथजोगी या चिमुकल्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. सोमवार ( दि. २० ) रोजी ही घटना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र मंगळवार ( दि. २१ ) रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास चिमुकल्याचे मृत शरीर शेततळ्याच्या पाण्यातून काढण्यात आले. त्यामुळे संपूर्ण इंदापूर तालुका ह्या घटनेने हळहळ व्यक्त करीत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, इंदापूर शहरातील आर्यन दोन मित्रांसोबत खेळायला गेला. खेळ संपल्यानंतर हातपाय धुण्यासाठी तालुका क्रीडा संकुलाच्या इनडोअर टेनिस कोर्ट च्या पाठीमागे असणाऱ्या शेततळ्यात पाय धुण्यासाठी गेला. आणि पाय घसरून तो शेततळ्यात पडला. सोबत असणारे दोन लहान मित्र यांनी घाबरून घराकडे पळ काढला. या घटनेबद्दल कोठेही वाच्यता केली नाही. संबंधित मुलाच्या आई-वडिलांनी इंदापूर पोलीस स्टेशन येथे मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार सोमवारी दिली होती. मंगळवारी सकाळी आर्यन सोबत खेळायला गेलेल्या दोन मुलांनी सदरची घटना सांगितल्याने आर्यन चा मृतदेह सापडला आहे.
मुलाचे आई वडील मजुरी करून आपले कुटुंब चालवतात. अत्यंत हलाखीत जीवन जगत असताना अचानक एक मुलगा पाण्यामध्ये बुडवून मृत्यू पावल्याने, या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या कुटुंबियांना धीर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे व त्यांच्या अन्य सहकारी मदत करीत आहेत.